ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२००४ नंतरच्या सेवेतील शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करा; माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिक्षक समितीची मागणी

अक्कलकोट : सातवा वेतन आयोगामध्ये निश्चिती होताना १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर त्रुटीच्या निराकरणासाठी वित्त विभागाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

६ व्या वेतन आयोगामध्ये नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर ५२००-२०२००(ग्रेड पे २८००) ही वेतनश्रेणी मिळत होती.प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने १२ वर्षांच्या नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने शिफारस केलेली वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जायची. त्यामुळे वेतनात वाढ होऊन ९३००-३४८००(ग्रेड पे ४२००) ही वेतन श्रेणी मिळत होती.म्हणजेच मूळ वेतनात ग्रेड पेमध्ये १४०० रुपयांची वाढ होत होती.जी वार्षिक वेतनवाढीच्या सुमारे तिप्पट होती.

शासनाने २ जानेवारी २०१६ पासून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाचा लाभ दिला.त्यावेळी ६ व्या वेतन आयोगाचे बेसिक ७ व्या वेतन आयोगामध्ये रूपांतरित करताना बेसिक गुणिले २.५७ हा फॉर्म्युला वापरला.त्यामुळे २ जानेवारी २०१६ पूर्वी ज्या शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या वेतनात ग्रेड पे तील फरक १४०० गुणिले २.५७ म्हणजेच ३५९८ रुपये इतकी वाढ झाली. जी रास्त आहे. मात्र २ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या म्हणजेच २ जानेवारी २०१६ नंतर १२ वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत ७ व्या वेतन आयोगामध्ये फार मोठा अन्याय झाला आहे.

१२ वर्षांच्या नियमित सेवा कालावधीनंतर शिक्षकांचे वेतन एस-१० मधून एस-१३ मध्ये निश्चित केले जात आहे.७ व्या वेतन आयोगाच्या अनुसुचिमध्ये चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नाही.त्यामुळे मूळ वेतनात ज्येष्ठ शिक्षकांप्रमाणे ३५९८ रुपये इतकी वाढ अपेक्षित असताना ही फक्त ७०० रुपये इतकी होत आहे,असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश हिंडोळे, तालुकाध्यक्ष शंकर अजगोंडे, सिद्धाराम बिराजदार, राजशेखर उंबराणीकर, बसवराज गुरव, यल्लप्पा ईटेनवरू, वासुदेव देसाई आदी उपस्थित होते.

 

जुन्याच वेतनश्रेणीत निवृत्त होण्याची आली वेळ

७ व्या आयोगामध्ये २ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या वेतनामध्ये ३ वेतनवाढीचा फरक पडतो आहे.शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने १२ वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने पदोन्नतीच्या संधी नसल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ जवळपास नष्ट झाला आहे.१ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना संपूर्ण सेवेत मिळणार या हक्काच्या वेतनश्रेणीचा लाभ न मिळता नियुक्तीच्या वेळी जी वेतनश्रेणी मिळाली.त्याच वेतनश्रेणीत सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!