ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“मलिक यांची औकात फक्त एक रूपयाची” मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार – मुन्ना यादव

नागपुर : ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना, गुन्हेगारांना शासकीय आयोग, बोर्डाच्या अध्यक्षपदी जागा दिली. मुन्ना यादव नावचा एक व्यक्ती जो नागपूरमधील नामचीन गुंड आहे ज्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे, असा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला होता. त्या सर्व आरोपांना मुन्ना यादव यांनी उत्तर दिली आहे.

नवाब मलिकांच्या सर्व आरोप मुन्ना यादव यांनी खोडुन काढले आहे. नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत असे म्हंटले आहे. माझ्यावर कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत. माझे अंडरवर्ल्ड सोबत संबंध नाहीत. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध सिद्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज जो बॉम्ब मलिक यांनी टाकला त्यात कोणताही दम नाही असंही मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

मुन्ना यादव यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्याच्या कामगार मंडळाचं अध्यक्ष का केलं? मी मलिक यांना सांगू इच्छितो, मी आता नवाब मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार आहे. नवाब मलिक यांची चौकशी सुरू होणार, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणार आहेत. माझी आत्तापर्यंत अनेकदा चौकशी झाली आहे. मी आताही कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन पण सिद्ध झाले नाहीत तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा असं आव्हानच मुन्ना यादव यांनी नवाब मलिकांना दिलं आहे.

माझ्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यासोबत भांडण झालं. त्यामुळे माझ्यावर राजकीय गुन्हा दाखल आहे. मात्र मला नवाब मलिक यांनी आज कुख्यात गुंड म्हटलं त्यामुळे मी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणार आहे. नवाब मलिक यांची औकात फक्त एक रूपयाची आहे त्यामुळे मी त्यांच्याविरोधात एक रूपयाचा मानहानीचा दावा करणार आहे असंही मुन्ना यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

माझ्या नावाचं भांडवल केलं जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला आहे. माझ्यावर नवाब मलिक यांनी केलेला आरोप खोटा आहे. मी त्यांना मानहानीचा दावा करून उत्तर देणार आहे असंही मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!