समीर दाऊद वानखेडेने आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम दाखला घेतला आणि लगेच दुसर्या दिवशी मृत्यूदाखला हिंदू म्हणून घेतला – नवाब मलिक
मुंबई दि. २५ नोव्हेंबर – समीर दाऊद वानखेडे याने आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
समीर दाऊद वानखेडे याने १६ एप्रिल २०१५ रोजी आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम महिला असे प्रमाणपत्र घेऊन ओशिवरा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले आणि लगेच दुसर्या दिवशी १७ एप्रिल २०१५ रोजी मुंबई मनपाकडून हिंदू नावाचा मृत्यूदाखला घेतला आहे याचे पुरावेही माध्यमांना दिले आहे. हे परिवार मुस्लिम असताना दुहेरी ओळख कशी दाखवत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
फर्जीवाडा करुन अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळवली आणि आता परिवार मुस्लिम असतानाही आईच्या मृत्यूचा दाखला मनपाकडून हिंदू म्हणून घेतला आहे. दोन पध्दतीची ओळख वानखेडे कुटुंब कसे ठेवत आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
आम्ही जे दाखले ट्वीट करत आहे ते दाखले मनपाकडून अधिकृत घेऊनच करत असल्याचे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
६ ऑक्टोबरपासून समीर दाऊद वानखेडे याचे अनेक फर्जीवाडे उघड करण्याचे काम सुरू केले आहे. ५० दिवसात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कसे अपहरण करण्यात आले. २५ कोटीची डील १८ कोटीवर झाली हे उघड झाले आहे. जन्माच्या दाखल्यात, शाळेच्या दाखल्यात फेरफार केले. बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली. अल्पवयीन असताना समीर दाऊद वानखेडे याच्या वडिलांनी समीर वानखेडे याच्या नावाने परमिट रुमचे लायसन्स घेतले. आम्ही हे सर्व समोर आणले आहेत.
एखादा व्यक्ती धर्म परिवर्तन करत असेल तर त्याचे गॅझेट करुन जाहीर करायचे असते. मात्र तसे करण्यात आले नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीची वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप केला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला. हा विषय चांदीवाल समितीसमोर विषय गेला. सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मात्र अजूनही कोर्टात पुरावे सादर करु शकले नाहीत. हे सर्व आरोप राजकीय हेतूने झालेले आहेत. अनिल देशमुख न्यायालयीन लढा लढत आहेत ते निर्दोष आहेत हे आम्ही सिध्द करु असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
परमबीर सिंह मे महिन्यापासून फरार झाले होते. मुंबई पोलीसांनी फरारी घोषित केल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि अटकेपासून संरक्षण मिळावे शिवाय आपल्या जीवाला धोका आहे असे सांगितले. मुळात मुंबई पोलीस आयुक्त राहिलेले परमवीर सिंह हे सांगत आहेत हे कुणीही स्विकारणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
पाच गुन्हे परमवीरसिंग यांच्यावर दाखल आहेत. त्यात चार गुन्हे हे खंडणीचे आहेत. लपले होते. आज येत आहेत. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
केंद्रसरकारने काल दोन निर्णय जाहीर केले. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले. त्याबाबत कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. पोटनिवडणूकात पराभव झाल्यावर भाजपाच्या हे लक्षात आले आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.कितीही निर्णय झाले तरी हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे देशातील जनतेच्या लक्षात आले आहे. आगामी पाचही राज्यात भाजपचा दारुण पराभव होणार आहे हे निश्चित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.