ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संमेलन स्थळाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक  :  कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्य सभामंडप उभारणीच्या कामांची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली. यावेळी साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी ३० तारखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित व्यवस्थापकांना दिल्या.

यावेळी जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी जर्मन पद्धतीचा मंडप घालण्यात येत असून, अतिशय मजबूत स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येत आहे. अतिशय भव्य दिव्य असलेल्या या सोहळ्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे सर्व कामकाज ३० तारखेच्या आत पूर्ण करण्यात येणार असून साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर होणारे कार्यक्रम मुख्य स्टेजवर करण्यात येणार आहे. त्यातून सर्व तांत्रिक बाबींची तपासणी देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, संपूर्ण नाशिकचा हा उत्सव असून बऱ्याच काळानंतर नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात नाशिक करांनी सहभागी होऊन उत्साहात सारस्वतांचे स्वागत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!