ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शाळेचा बनावट दाखला तयार करुन त्याआधारे जातीचा दाखला काढुन निवडणुक लढवल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील घटना शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करुन त्याआधारे जातीचा दाखला काढला. त्या दाखल्याच्या आधारे निवडणुक लढवून फसवणुक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. माहितीच्या अधिकारातुन हा प्रकार उघडकीस आला असून यात निवडणुक लढवलेल्या उमेदवारासह पतीविरुद्व अक्कलकोट उत्तर पोलिसात शनिवार दिनांक ४ डिसेंबर, २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

यात मुजीप (नाना) नबिलाल नदाफ (वय ३६, व्यवसाय व्यापार, रा. पितापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्यादीत दिली आहे. नदाफ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पितापूर या ग्रामपंचायतची २०२० ते २०२५ ही पंचवार्षिक निवडणुक जानेवारी २०२१ मध्ये झाली आहे. यामध्ये ग्रामंपचायत सदस्य विजयाबाई सुरेश व्हनमाने या प्रभाग क्र. १ मधुन बिनविरोध निवडुन आल्या आहेत. तो प्रभाग हा नागरीकाचा मागास प्रवर्ग स्त्री या करिता राखीव होता. त्या निवडणुकीत माझी आई मालन नबीलाल नदाफ उभी होती. ती प्रभाग क्र. २ मधुन निवडुन आली. त्यानंतर माझी आई मालन नबीलाल नदाफ ही निवडुन आलेल्या सर्व उमेदवाराचे जे त्यांनी निवडणुक लढविण्यापूर्वी निवडणुक आयोगाला नामनिर्देशन कागदपत्र सादर केले होते. त्या कागदपत्राची नकल तहसिलदार अक्कलकोट विभाग यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार संबंधित निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवाराचे नामनिर्देशन कागदपत्राच्या प्रती या माहिती आधिकार कायद्याअन्वेय आम्हाला प्राप्त झाल्या.
त्यात निवडुन आलेली महिला विजयाबाई सुरेश व्हनमाने यांचा शाळा सोडल्याचा दाखला हा बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे मी शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत घेऊन ज्या ठिकाणी विजयाबाई सुरेश व्हनमाने यांचे शिक्षण झाले ती शाळा घोळसगाव येथे आहे. तेथे शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत पत्र देवुन माहिती अधिकाराच्या कायद्याअन्वेय माहिती मिळविले तेंव्हा त्याठिकाणी शाळेच्या दाखल्यावर वडीलाकडील नाव विजया केशव देवकर असे आहे.

याबाबत संबंधीत मुख्याध्यापक यांच्याकडील पत्राद्वारे विजया सुरेश व्हनमाने व त्यांचे पती सुरेश रामकृष्ण व्हनमाने यांनी संगनमत करून कोणाची तरी मदत घेऊन घोळसगाव येथील शाळेमध्ये शिकलेले नसताना तेथील शाळेमध्ये शिकलेले आहे असे भासवुन तेथुन बनावट दाखला तयार करून शाळा सोडल्याचा दाखला मिळवला. त्याआधारे जातीचा बनावट दाखला तयार करून तो दाखला पितापूर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी वापरून निवडणुक आयोगाची फसवणुक केली आहे. बनावट दाखल्याचा वापर करत ग्रामंपचायत निवडणुक लढवली आहे. त्यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिसात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा क्र. ०५६२ नुसार दि.०४/१२/२१ रोजी दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!