अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरात आता कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे व सचिव स्वामींनाथ स्वामी यांनी दिली.
सध्या देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल जोरदार चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारसह जिल्हाधिकाऱ्यांनी काही आदेश बाजार समितीसह विविध शासकीय कार्यालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आम्ही प्रभावीरित्या करत असून दुधनी बाजार समितीच्या आवारातील सर्व अडते, व्यापारी, मुनीम, हमाल, तोलार व येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सूचना देऊन आवाराबाहेर आदेशाच्या पालनाबाबत सूचना करण्यात आलेले आहेत तसेच जे लोक नियम पाळत नाहीत, त्यांना दंड देखील आकारण्याबाबत सूचना फलक लावण्यात आला आहे.
प्रवेश करणाऱ्यांचे दोन डोस लसीकरण झाल्यानंतर चौदा दिवस झाल्याचे तपासूनच प्रवेश देण्यात येत आहे. लसीकरण न केलेलयांना परत पाठवण्यात येत आहे. नागरिकांची सोय व्हावी म्हणून बाजार समितीकडून मुख्य गेटवर लसीकरणाची देखील सोय करण्यात आली आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.