गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सामर्थ्य हे यशाचे गमक; विद्यापीठात तीन दिवसीय लघु चित्रपट कार्यशाळेचे उद्घाटन
सोलापूर- गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सामर्थ्य हे यशाचे गमक आहे, याद्वारे विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःला सिद्ध करावे मगच यश मिळते. तरुण पिढीसाठी दिग्दर्शक अक्षय इंडिकर हे आदर्श उदाहरण आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय लघु चित्रपट कार्यशाळेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. फडणवीस बोलत होत्या. दि. 24 डिसेंबर 2021 रोजी दुपारी एक वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हा समारंभ संपन्न झाला. मंचावर चित्रपट, लेखक, निर्माता व दिग्दर्शक अक्षय इंडीकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी दत्ता गायकवाड, राजशेखर शिवदारे, दिनेश शिंदे , सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर आदी उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. एस .के . पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रेनिक शाह, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणापूर, माजी अधिष्ठाता डॉ. विकास कदम, इनक्युबेशन विभागाचे संचालक डॉ. सचिन लड्डा, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ प्रकाश व्हनकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या भाषणात पुढे बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, उच्च शिक्षणासाठी मोजक्याच विद्यार्थ्यांना संधी मिळते, ती संधी तुम्हा विद्यार्थ्यांना मिळाली आहे. यशवंतराव चव्हाण आणि अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श आपण प्रत्यक्ष जीवनात घेतले तर आपण समाजाचा आणि देशाचा विकास घडवू शकाल. आजच्या काळामध्ये चांगले यश मिळविण्यासाठी कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे आहे. हे कौशल्य अंगी बानवून चित्रपटासारखे माध्यम जर आपण अवलंबिले तर आपल्या जीवनात आणि अनेकांच्या जीवनात आपण मोठे बदल घडवू शकतो.
दत्ता गायकवाड म्हणाले, डॉ. फडणवीस यांनी कुलगुरूपदाची धुरा सांभाळल्यानंतर विद्यापीठाचे स्वरूप पालटले आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अभ्यासक्रम सुरू होऊन विद्यार्थ्यांचा विकास सुरू झाला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असते याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
डॉ. कांबळे म्हणाले, आजच्या तरूण पिढीला आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले यश संपादन करावे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिंदे यांनी अक्षय इंडिकर यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.अंबादास भासके यांनी केले. या कार्यशाळेत शंभर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचा समारोप रविवार, दि. 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्री धर्मण्णा सादूल आणि विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. के. पवार यांच्या हस्ते होणार आहे.
चौकट –
जगभरात मराठी सिनेमा पोहोचविता आला – अक्षय इंडीकर
मी सोलापूरचा भूमिपुत्र असल्याचा मला अनुभव अभिमान आहे. मराठी सिनेमा जिथे कधीच पोहोचणार नाही, अशा जगभरातील विविध देशांमध्ये मराठी सिनेमा पोहोचावा, या संदर्भाने सीमा रेषाची बंधने ओलांडून जगभर मराठी सिनेमा पोहोचू शकलो, याचा मला आनंद वाटतो. सिनेमाची स्वतःची अशी स्वतंत्र भाषा आहे, त्यामुळे मला हे करता आले.