सर्जेराव जाधव यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी : पाटील, अक्कलकोट येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२५: गोरगरीब, वंचित आणि निराधारांना विविध मार्गाने अर्थ सहाय्य करणाऱ्या स्व.सर्जेराव जाधव यांचे कार्य मोलाचे असून ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते म्हणून त्यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादनअक्कलकोटचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले. सर्जेराव जाधव यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शरद फुटाणे हे होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, सर्जेराव जाधव यांच्या सारखी निस्वार्थ माणसे समाजात तयार होण्याची गरज आहे जर अशी माणसे तयार झाली तर समाजाचा पर्यायाने गोर गरीब जनतेचा विकास होईल. अशा संस्था पण तयार होतील.जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे चांगले आहे ते अधिक व्यापक स्वरूपात व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी स्वामी समर्थ आणि जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेशराव फडतरे, मोहन चव्हाण, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबा निंबाळकर, सुभाष गडसिंग, शिवाजीराव पाटील, डॉ.हेरंबराज पाठक, शिवकन्या पाटील, सुरेश सुर्यवंशी, अरुण जाधव, अरविंद कोकाटे, संतोष जाधव, विलास गव्हाणे, प्रभाकर मजगे, विठ्ठल तेली आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी विश्वस्त फडतरे यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली.कार्यक्रमात राजीव माने व निंबाळकर यांनी स्व.जाधव आणि माजी आमदार बी.टी.माने यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.या कार्यक्रमात तालुक्यातील ट्रस्टकडे अर्ज केलेल्या गरजूंना नियमानुसार आर्थिक, वैद्यकीय तसेच शैक्षणिक मदतीचे धनादेश व चादरी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त चव्हाण यांनी केले तर आभार पाटील यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील गरजू लाभार्थी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदैव मदतीचे कार्य
गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. यावर्षी देखील काही निवडक गरजू लोकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट व विमलाबाई जाधव न्यासतर्फे दरवर्षी असे कार्यक्रम घेतले जातात – शरद फुटाणे, ट्रस्ट अध्यक्ष