ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या शिबिरात पहिल्या दिवशी ७० जणांनी केला अर्ज, पात्र लाभार्थ्यांना मिळणार ५० हजाराची मदत

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.२४ : कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस मदत निधी मिळावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तालुक्यातुन २०५ पैकी ७० जणांनी ऑनलाइन अर्ज केला. याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली.

काही अर्जांची किरकोळ पूर्तता बाकी आहे. तेही पूर्ण होऊन जाईल.त्यात काही आयसीएमआर कोड नसलेले आहेत. तोही विषय मार्गी लागेल, असेही तहसीलदार यावेळी म्हणाले. यासाठी आज जुने तहसील कार्यालय व नगर परिषद कार्यालयात पात्र लाभार्थ्यांसाठी शिबीर भरविण्यात आले होते. आज पहिला दिवस होता. उद्या पुन्हा दुसरा दिवस आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रासह शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब शिरसट आणि मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

दरम्यान कोव्हीड १९ ने मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकाने ऑनलाइन पध्दतीने अर्ज करत आहेत. ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, आधार क्रमांक, मृत पावलेल्या व्यक्तीचा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम-१९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र तसेच दवाखान्याचे मृत्यू प्रमाणपत्र, आयसीएमआर कोड क्रमांक, इतर निकट नातेवाईंकांचे ना हरकत असल्यांचे स्वयं घोषणापत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!