नवीन वर्षाची सुरुवात झाली एका दुःखद घटनेने, वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यु
जम्मू-काश्मीर : नवीन वर्षाची सुरुवात एका दुःखद घटनेने झाली आहे. नववर्षानिमित्त कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणांच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत वाढते, त्यामुळे चेंगराचेंगरी कशी झाली, वैष्णोदेवी मंदिरात रात्री पावणेतीन वाजता झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना कटरा येथील नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Injuries reported in a stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra. Rescue operation underway: Police Control Room, Reasi pic.twitter.com/ex6vumreAF
— ANI (@ANI) January 1, 2022
चेंगराचेंगरीत मरण पावलेले भाविक दिल्ली, हरियाणा, पंजाब येथून आले होते. या घटनेत ठार झालेला एक भाविक हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. सामुदायिक आरोग्य केंद्राचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ गोपाल दत्त यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या आकड्यांबाबत नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही.
केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. यासोबतच, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.