---Advertisement---

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांचा व्हिडिओ व्हायरल; तरुण अटकेत !

By team
On: March 10, 2026 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था 

येथे ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या तरुणाच्या कुटुंबाला परिसरातील हिंदू शेजाऱ्यांनी मदतीचा हात देत सामाजिक ऐक्याचे उदाहरणही समोर आले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सदर तरुण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देताना दिसत होता. या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांनी रविवारी शहरातील झोपडपट्टी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. हा तरुण कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असून तो बांधकाम साईटवर इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो.

या घटनेनंतर परिसरातील मुस्लिम कुटुंबांनी सोमवारी होणारा इफ्तार कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी आरोपी तरुणाच्या कुटुंबाची बाजू घेत त्यांना धीर दिला. शेजाऱ्यांच्या मते, संबंधित तरुण चांगल्या स्वभावाचा असून त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो सकाळी कामावर जातो आणि सायंकाळी घरी परतल्यानंतर आईला घरकामात मदत करतो. “तो वाईट मुलगा असता तर आम्हीही त्याच्यावर कारवाईची मागणी केली असती; पण त्याच्याकडून अनवधानाने चूक झाली आहे,” असे शेजाऱ्यांनी सांगितले.

शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका बांधकाम साईटवर काम करत असताना त्याच्या मित्रांनी त्याला ही घोषणा करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ चित्रीत करून एडिट करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. संबंधित तरुणाने आपल्या कृत्याबद्दल आधीच माफी मागितल्याचेही त्यांनी सांगितले. परिसरात हिंदू आणि मुस्लिम कुटुंबे अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती देताना मिलिंद मोहिते , पोलिस उपायुक्त (झोन-२), यांनी सांगितले की, बांधकाम साईटवर काम करत असताना त्याच्या सहकाऱ्याने हा व्हिडिओ चित्रीत केला होता. व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. एका संघटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२ आणि १९६ (१) अंतर्गत दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्या तरुणाच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याचा मोठा भाऊ दिव्यांग असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यामुळे त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडून कामावर जावे लागले. तो बांधकाम साईटवर इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो, तर त्याची आई घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते.

आरोपीच्या आईने सांगितले की, “व्हिडिओ नीट पाहिल्यास माझ्या मुलाला तसे बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे, हे लक्षात येईल. त्याने जे बोलले त्याचे काय परिणाम होतील, याची त्याला कल्पनाही नव्हती. तो अजून लहान आहे आणि त्याने आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली आहे,” असे त्या म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!