ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मच्छिमारांच्या पलायनामुळे बेकायदा मांगूर प्रकल्पावरील कारवाई थंडावली, शिष्टमंडळ घेणार आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 

अक्कलकोट, दि.३ : संधी मिळताच मच्छीमारांनी पलायन केल्याने कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगूर प्रकल्पावरील कारवाई थंडावली आहे.चौथ्या दिवशी काम पूर्णपणे बंद असल्याने उर्वरित माशांची विल्हेवाट कोण लावणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी उद्या (मंगळवारी) अक्कलकोट तालुक्यातील शिष्टमंडळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेणार आहे.
या शिष्टमंडळात पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे,कुरनूर धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,माजी सरपंच अमर पाटील, युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह सुरवसे वस्ती येथील शेतकऱ्यांचा समावेश राहणार आहे.गेल्या आठवड्यात कुरनूर धरणालगत बेकायदा मांगुर प्रकल्प सुरू असल्याची बाब शेतकऱ्यांनी उघडकीस आणली होती.त्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन यावर तीन दिवसापूर्वी कारवाईला सुरुवात देखील केली होती पण कारवाई कशाप्रकारे करायची हा प्रश्न प्रशासनासमोर होता.त्यावेळी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी पोलीस,पाटबंधारे विभाग ,मत्स्य विभाग आणि नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेतली होती.त्यावेळी सर्व मांगुर मासे हे मच्छीमारांच्या सहकार्याने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर सुरूवातीला दोन दिवस मच्छीमारानी सहकार्याची भूमिका घेतली परंतु तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पुर्णपणे अंग काढून घेतले आणि या परिसरातून पलायन केले.त्यामुळे ही कारवाई आता पूर्णपणे थंडावली आहे.त्यासाठी लावण्यात आलेली पोकलेन मशीन दिवसभर थांबून आहे.त्यामुळे यापुढील काळात हा प्रकल्प पूर्णपणे उध्वस्त कसा होणार असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. स्थानिक प्रशासनाला काही मर्यादित स्वरूपाचे अधिकार आहेत त्यामुळे कारवाई करताना अडचणी निर्माण होत आहेत.याप्रकरणी आता जिल्हा स्तरावरूनच कारवाई होण्याची गरज आहे.त्या दृष्टिकोनातून हे शिष्टमंडळ उद्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेटून निवेदन देऊन चर्चा करणार आहे.

मत्स्य विभागाचा
अजब दावा

सर्व तलावाचे अंतर्गत बंधारे फोडून पाणी एकत्रित करण्यात आले अशा वेळी दोन टन माशांची विल्हेवाट लावण्यात आली. याबाबत मत्स्य विभागाला विचारले असता त्यांनी सांगितले की,राहिलेले मासे जे आहेत. त्या छोट्या माशांना मोठे मासे खाऊन टाकतील आणि मोठ्या माशांना अन्न न मिळाल्यास आपोआप ते मरून जातील,अशाप्रकारचा
अजब दावा करून संतापात भर टाकली
आहे.

 

सामाजिक
संघटना शांत

या प्रकल्पाच्या दूषित पाण्यातून लाखो
जिवांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.असे असताना विविध समस्यांवर आंदोलन करणाऱ्या सामाजिक संघटना मात्र यावर गप्प आहेत.कुरनूर धरणावर तीन नगरपालिका
आणि ५१ गावचा पाणीपुरवठा आहे.हा प्रकार गंभीर असून या विरोधात लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!