अक्कलकोट, दि.७ : पत्रकारांनी सामाजिक नीतिमूल्यांची जाणीव ठेवून विधायक आणि विकासात्मक पत्रकारिता करावी त्यांच्याकडून समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत,
असे प्रतिपादन प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी केले. अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त शहर व ग्रामीण
भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुनंदा राजेगावकर या होत्या.पुढे बोलताना प्रा.बिराजदार म्हणाले की, समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी घडत असतात.पत्रकाराने जर चांगल्या विधायक आणि सकारात्मक गोष्टी समाजासमोर आणल्या तर समाजामध्ये निश्चितपणे बदल दिसून येईल. त्यादृष्टीने पत्रकारांनी अधिक विचार करावा,असे त्यांनी सांगितले.राजेगावकर म्हणाल्या
की, पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा आहे.तो जिवंत ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांनी सुरू ठेवले आहे.यापुढेही त्यांनी ही परंपरा कायम ठेवावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सिद्धे म्हणाले, अक्कलकोट तालुक्यातील अनेक पत्रकार हे चांगले आहेत.वेळोवेळी तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवतात.त्यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.याप्रसंगी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा मास्क,पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य मीराताई बुद्रुक, शिवराज स्वामी, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, शंकर व्हनमाने आदी उपस्थित होते.