मारुती बावडे
अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोटला लवकरच १०० फूट लांबी आणि ५५ फूट उंचीची अत्याधुनिक आकर्षक अशी भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने ही कमान करुन देण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांनी घेतला आहे.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येतात. त्यांचे स्वागत आकर्षक कमानीने व्हावे, ही संकल्पना या पाठीमागे आहे.केवळ कमान उभारली जाणार नाही तर अक्कलकोटमध्ये ज्यावेळी भाविकांचा प्रवेश होतो त्या चौकाचे सुशोभिकरण देखील या प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येणार आहे. पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळा सुरु आहे.त्यावेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आल्यानंतर प्रतिष्ठनाने हा निर्णय घेतला आहे.यावर सुमारे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
या अक्कलकोट शहरा लगत सोलापूर रोडवर भव्य – दिव्य प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे.१०० फूट लांबी आणि ५५ फूट उंच, संपूर्ण आर लसीसी बांधकाम,त्यात श्री स्वामी समर्थ, श्री दत्त महाराज आणि चोळप्पा महाराज यांच्या मूर्ती असणार आहेत. इंडस्ट्रियल फायबरद्वारे या मूर्ती होणार असून त्याला १०० वर्ष काही होणार नाही.या कामी अक्कलकोटच्या नगराध्यक्ष शोभा खेडगी यांनी पालिकेचा ठराव मंजूर
करून दिला होता.या कमानीमुळे शहराच्या वैभवात आणि सौंदर्यात मोठी भर पडणार
आहे.
◆ निर्णयाचे पालिकेकडून स्वागत
स्वामी समर्थ प्रतिष्ठानने नगरपालिकेकडे
रीतसर परवानगी मागितली होती. त्यावेळी आम्ही कशाचाही विचार न करता तातडीने हा निर्णय चांगला असल्याने त्याला मंजुरी दिली. मंडळाने अक्कलकोट शहरासाठी सामाजिक बांधिलकी दाखवली ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे – बसलींगप्पा खेडगी, नगरसेवक
◆ सहा महिन्यात काम पूर्ण होणार
सगळ्या तीर्थक्षेत्राला आम्ही जाऊन आलो. अनेक ठिकाणी स्वागत कमानी होत्या. अक्कलकोटमध्ये मात्र पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वामींच्या गावी करायचा निर्णय घेतला.येत्या सहा महिन्यांत हे काम आम्ही पूर्ण करून देणार आहोत – राजेंद्र देशमुख,अध्यक्ष, स्वामी समर्थ प्रतिष्ठान,पुणे