सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात; देशाला पुढे नेण्यासाठी मातृभाषा व मातृभूमीबाबत कर्तव्याची जाणीव हवी: राज्यपाल श्री कोश्यारी
सोलापूर – नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल घडत आहेत. देशाला आणखी पुढे नेण्यासाठी आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलपती महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पडला. यावेळी महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी ऑनलाइन माध्यमातून या सोहळ्यात सहभागी होत स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण केले. ऑफलाइन सोहळ्यात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर चार विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात मान्यवर व उपस्थित पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाचा बाराबंदी गणवेश परिधान करून सहभाग नोंदविला.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विविध क्षेत्रात कीर्तिमान प्रस्थापित केले आहेत. विद्यापीठ नवनवीन योजना आखत असून, त्या अमलातही आणत आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही विद्यापीठ चांगली प्रगती करेल. सोलापूर एक औद्योगिक शहर आहे, त्यामुळे या शहरातील उद्योगांना सोबत घेऊन विद्यापीठाने नवे अभ्यासक्रम सुरु करावेत, त्याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतील. तसेच नवीन स्टार्टअप निर्माण होऊ शकतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुवर्णपदके मिळवण्यात विद्यार्थिनी जास्त आघाडीवर आहेत, ही विशेष अभिनंदनाची बाब आहे. विद्यापीठाची धुरा महिला कुलगुरू डॉ. फडणवीस समर्थपणे सांभाळत आहेत, त्यामुळे अपेक्षेनुसार विद्यापीठाची प्रगती होत आहे.
कोविडच्या संदर्भाने बोलताना महामहीम कोश्यारी म्हणाले की, कोरोनाला घाबरू नका, मात्र सारे नियम पाळा आणि काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी लस घेणे, मास्क घालणे, सॅनीटायजरचा वापर करणे, गर्दी न करणे या गोष्टींचे जबाबदारीने पालन करावे. कोविड बाधितांची संख्या थोडी कमी होताच लोक गर्दी करतात, हे योग्य नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी विद्यापीठाचा अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की, विद्यापीठाची सर्वांगीण प्रगती झाली आहे. विद्यापीठाला शासनाकडून अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 14 कोटी 74 लाख रुपये मंजूर झाले आहेत. कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी 25 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. खेलो इंडिया योजनेद्वारे 4 कोटी 50 लाखाची निधी मिळाली असून त्यातून शंभर एकर परिसरात क्रिडांगणाची कामे केली जाणार आहेत. ग्रीन कॅम्पसमध्ये ही विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले नामांकन मिळाले आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या वतीने विद्यापीठाला 14 तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात आले असून त्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधकांना मोठी संधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले असून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. संशोधकांनी अनेक पेटंट मिळवलेले आहेत, त्याचप्रमाणे विद्यापीठातील विविध संकुले तसेच विविध विभागांनी चांगली कामगिरी केली असल्याचेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण 12 हजार 239 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. याचबरोबर 62 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 55 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. डी. नवले, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. डी. तिकटे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. के. पाटील आणि आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे यांनी स्नातकांना सादर केले. त्यानंतर महामहिम राज्यपाल कोश्यारी यांनी पदवी प्रदान करीत असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले.