सोलापूर – जीएसटी परिषद बैठकीत कपड्यांवरील १२ टक्के लावण्यात आलेला जीएसटी ५ टक्के पूर्ववत करीत जीएसटी दरवाढीचा निर्णय स्थगित केला. या निर्णयामुळे सोलापूरसह देशभरातील टेक्स्टाईल, गारमेंट उत्पादक व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. भविष्यात वस्त्रोद्योग व कामगारांच्या विकासासाठी केंद्रात पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची संसदीय अधिवेशन काळात सोलापुरातील व्यापाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह घेतलेल्या भेटीस मोठे यश आल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी म्हणाले.
सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक व सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ (गारमेंट असोसिएशन) यांच्या वतीने खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे जीएसटी परिषदेने कपड्यांवरील लागणारी जीएसटी 12% ऐवजी पूर्ववत ५ % करण्यात आली. त्यानिमित्त खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय स्थगित केला. हा निर्णय स्थगित करण्यासाठी देशातून एकमेव खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पुढाकार घेतल्याने देशभरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. याबद्दल आभार मानत सोलापूर गारमेंट असोसिएशन व सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाच्या वतीने उद्योजक यांनी आपल्या मनोगतात खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे आभार मानले.
संसदीय अधिवेशन काळात याबाबत सोलापुरातील व्यापाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान या विषयाबाबत मागणी केली. याचाच विचार सरकारने घेतला. या निर्णयाने आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे कपड्यांच्या किमती नियंत्रणात राहतील असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले.
थेट अध्यक्षांना संपर्क
याप्रसंगी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी जीएसटी काऊन्सिल ऑफ मिनिस्ट्रीचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी संपर्क करीत जीएसटी 5% कायम ठेवण्याची विनंती केली. यावर आपण सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने उपस्थित उद्योजक आनंदित झाले.