गुरुशांत माशाळ,
दुधनी दि. १३ : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली सर्व नियम पाळत “बोला एकदा भक्तलिंग हर्रss बोला हर्रss” “शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज कि जय, श्री शांतलिंगेश्वर महाराज कि जय” या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या दिव्यसानीध्यात देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी आणि देवस्थान पंचकमिटिच्या सदस्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडला.
बुधवारी सकाळी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या देव-देवातांना भक्तिमय व मंगलमय वातावरणात तैलाभिषेक करण्यात आला. प्रारंभी मंदीरात श्रींच्या मुर्तीस जलाभिषेक त्यानंतर हळद व तेल लावुन तैलाभिषेक करण्यात येऊन पान, सुपारी, खारीक, बादाम, खोबरे, ऊस, गाजर आणि बोर यांचा विडा ठेवुन पुजा करण्यात आली. त्यानंतर मंदीर समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मानकरी आणि मंदिर समितिचे सदस्य गावातील देव-देवतांना तैलाभिषेक करण्यास मार्गस्थ झाले.
दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला मोठी परंपरा आहे. दुधनीत दरवर्षी मकर संक्रात निमित्त मोठी यात्रा भरविला जातो, ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस दुधनीसह कर्नाटक राज्यातील कलबुर्गी, विजयपूर आणि इतर जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थितीती लावतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने मोठी गर्दी होणाऱ्या यात्रावर बंदी घातली आहे आणि यात्रेस परवानगी नाकारली होती. यामुळे देवस्थान पंच कमिटीने सलग दुसर्या वर्षी दुधनीतील यात्रा रद्द करून केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्या प्रसंगी मोठीगर्दी असायचं. मात्र यंदाच्या कोरोना महामारीमुळे नेमक्याच लोकांच्या उपस्थीतित अक्षता सोहळा पार पडला.
सकाळी अक्षतेचे मानकरी ईरय्या पुराणिक यांच्या घरात पोथी – पुराण ग्रंथाची पुजा करण्यात आले. त्या नंतर संबळाच्या निनाद करत पोथी – पुराण सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सिद्धेश्वर मंदिरा समोरील सम्मती कट्ट्याजवळ देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गिरमल्लप्पा सावळगी, सातलिंगप्पा परमशेट्टी, प्रभुलिंग पाटील, सिद्धाराम मल्लाड यांच्या हस्ते सुगडी पुजन करण्यात आले. त्या नंतर अक्षता सोहळ्याचे मानकरी ईरय्या पुराणिक आणि चन्नविर पुराणिक यांनी सम्मती कट्ट्यावर सम्मती वाचनास सुरुवात केली.
नंदीध्वज हे सिद्धरामेश्वरांचे योगदंडाचे प्रतीक मानला जातो. यंदाच्या वर्षीही पोलिस प्रशासनाने नंदीध्वज मिरवणुकीची परवानगी नाकारली होती. त्यामुळे मानाच्या पाच नंदीध्वजांना सम्मती कट्ट्याजवळ ठेवुन विधवत पुजन करण्यात आले.
या वेळी मल्लिनाथ म्हेत्रे, शिवानंद माड्याळ, मलकाजप्पा अल्लापुर, बसण्णा धल्लू, लक्ष्मीपुत्र पाटील, मल्लिनाथ येगदी, सुगुरेश बाहेरमठ, शिवानंद फुलारी, मल्लय्या पुराणिक, गुरूपादय्या सालीमठ, लक्ष्मीपुत्र पाटील, निंगप्पा सोळशे, काशिनाथ गाडी, शिवानंद हौदे, चंद्रकांत म्हेत्रे, मल्लिनाथ फुलारी, महानिंग कलशेट्टी, विश्वनाथ गंगावती, मल्लिनाथ सोन्नद, शरणबसप्पा मगी, लक्ष्मीपुत्र भाईकट्टी, महेश गुळ्गोंडा उपस्थित होते.