ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अलीकडच्या काळात तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवला का ? आपण कुठे तरी चुकतोय का…? नक्की वाचा !

खरंच आमचा रस्ता कुठेतरी चुकतोय… रस्ता आम्ही चुकवतोय की? आमचा रस्ता कुणीतरी चुकवतोय ? हे समजेना झालंय. होय, एकेकाळी चालण्यासाठी पक्के रस्ते नव्हते, तंत्रज्ञानाच्या जोरावर बदल घडवत एक पदरी, दोन पदरी, चार पदरी रस्ते आम्ही बनवले. आतातर थेट युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास रस्त्यावर विमान उतरेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आणि शिक्षणासाठी मात्र जुन्याच रस्त्याचा वापर केला जात आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत अखंडित शिक्षण सुरू रहावे यासाठी एका नव्या रस्त्याची गरज निर्माण झाली आहे का?

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शिक्षण चालू आहे मात्र शाळा बंद आहेत. मोठ-मोठ्या शाळा बांधण्यात आल्या. मात्र सद्या त्याला कुलूप आहे. विद्यार्थी शाळेत जाऊ इच्छित आहेत. मात्र त्याला कोरोनाच्या नावाखाली आडकाठी निर्माण होत आहे. (आडकाठी निर्माण होत आहे की निर्माण केली जात आहे हे अद्याप कळु शकले नाही) त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा मात्र नक्की निर्माण होत आहे.

देशात आणि राज्यात इतके ऑक्सिजनची गरज भासल्यास लॉकडाऊन करू, हॉटेल बंद करू, शाळा बंद करू, हे बंद करू,  ते बंद करू सद्या हेच सुरू आहे.

जर वारंवार शाळा बंद होत राहिले तर विद्यार्थ्याचे पुढचे भविष्य काय? आणि कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार असेच होत राहीले तर आम्ही पुढच्या पिढीला वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षक, समाजसेवक, इंजिनिअर, मेकॅनिक कसे घडवू शकतो याचा विचार केला पाहिजे ? यावर काही ना काही तोडगा काढला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी शाळेत गेला पाहिजे. तरच त्याचे पुढचे भविष्य प्रकाशमान होईल. अन्यथा अंधारात जाणार हे नक्की.अरे बाबांनो तुम्ही वारंवार शाळा बंद करत राहिला तर सद्याच्या घडीला जितके वैज्ञानिक, शिक्षक, डॉक्टर्स, नर्सेस, इंजिनिअर्स, मेकॅनिक आहेत ते एक ना एक दिवस देवाच्या घरी जाणार आहेत. ते गेल्यावर पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी कुठून आणणार आहात.याचा विचार कुठे तरी करा ना….!

ग्रामीण भागातील शिक्षणात आणि शहरी भागातील शिक्षणात फारसा फरक नाही. सद्याच्या घडीला ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये तुलना केल्यास शहरी भागातील विद्यार्थी नक्कीच वरचढ होतील.कारण ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, मोबाईल असेल तर रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत. पैश्यासाठी पालकांच्या हाती काम नाही. सगळं असेल तर कधी-कधी रेंज उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

गेल्या वर्षभरात मुले शाळेत गेले नाहीत. कोणी पेपर दिले, कोणी नाही दिले. त्या सर्वांना पुढच्या वर्गात पाठवण्यात आले. नंतर जवळपास दीड ते पावणेदोन वर्षांनंतर शाळा सुरु झाल्या.तेही सुरुवातीला नववी ते बारावी, त्यानंतर पाचवी ते आठवी, त्यानंतर डिसेंबर महिन्यात पहिली ते चौथी वर्ग सुरू झाले. नवीन मुलांचा पहिली वर्गात प्रवेश झाला मात्र ते अजूनही प्रत्यक्षात शाळेत गेलेच नाहीत. काही पालक आपल्या घरीच लहान मुलांना शिक्षण घेत आहेत. (नर्सरी, एलकेजी, युकेजी, बालवाडी, अंगणवाडी सुरु झाल्याचं नाही यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा रसच निघून जात आहे ) जे सुशिक्षित आहेत. ते त्यांच्या पाल्याना घरात (ABCD, अआइई, ಅ ಆ ಇ ಈ) शिकतात. जे अनपड व अशिक्षित आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षणाचे काय ? हा मोठा प्रश्न आहे.

सद्या ऑनलाइन शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. पहिली-दुसरी, नर्सरी, अंगणवाडीच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण काय कळणार आहे का? त्यांना आतापासूनच मोबाईलची सवय लावायची का? इतक्या लहान वयात मोबाईल वापरामुळे त्यांच्या मनावर, शरीरातील अवयवांवर परिणाम होणार नाही का? याचा विचार करायला पाहिजे. राजकर्त्यांनी शाळा बंद करण्याकगी घोषणा देण्यापूर्वी वरील सर्व गोष्टी लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटतं.

लहान मुलांना प्रत्यक्ष वर्गात शिक्षक हाव-भाव करून शिकवतात. त्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमध्ये मिळू शकत नाही. कारण विद्यार्थी समोर असताना शिक्षक आपल्याकडील विविध प्रकारच्या कला गुणांद्वारे विशेष हाव-भाव करून शिकवण देतो. तोच हाव-भाव वर्ग खोल्या रिकाम्या ठेवून, कॅमेरा समोर उभारून केले तरी ते स्वतः त्यांनाच आवडणार नाही. कारण शिक्षकांना विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात असताना एक वेगळा आनंद मिळत असतो. शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर प्रेम असते आणि त्याप्रति त्यांची देखील एक आदराची भावना असते.त्या दोघांमध्ये एक विशेष बांधिलकी असते. शिक्षकांच्या प्रेमामुळे व त्यांच्या शिकवणीच्या आकर्षणामुळे विद्यार्थी न चुकता शाळेत जातात.

सद्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर परिणाम होत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कल शिक्षणाकडे कमी तर गेम खेळण्याकडे अधिक झाला आहे.सतत एका ठिकाणी बसून मोबाईल वापरत असल्याने काही मुलांमध्ये स्थूलता आली आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये चंचलता, चिडचिड निर्माण होत आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही पालक विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर काही प्रमाणात बंधन घातले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे मोबाईल देताना शंभरवेळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईल दिला तरी त्याचा योग्य वापर होत आहे की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

वर्गात शिक्षक शिवताना जी अस्सल मजा आहे. ते सद्याच्या ऑनलाइन वर्गामध्ये दिसत नाही. कारण सर्व शिक्षक रोज आपापल्यापरीने ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे शिकवत आहेत. मात्र ते शिक्षण काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाहीये.

शिक्षक वर्गात धडा शिकवत असताना जी भीती असते. ती भीती ऑनलाइन वर्गात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदर कमी होत आहे की काय? असा प्रश्न देखील निर्माण होत आहे.

जेव्हा मी पाचवी – सहावीत शिकत होतो.तेंव्हा आमचे काही शिक्षक अभ्यास घेताना चुकलं तर अक्षरशः तुडवून-तुडवून काढायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक आणि अभ्यास दोन्ही गोष्टी लक्षात ठेवावे लागत असे. शाळेत असताना मधल्या सुट्टीत मित्रांसोबत खेळणं – भांडण खुप काही मजा असायची. आमच्या प्रत्येक गोष्टीवर शिक्षकांचे स्टाफरूम मध्ये बसूनच लक्ष असायचे. जेवणाच्या सुट्टीत दहा-पंधरा मित्र एकत्रित गोल रिंगण करून जेवायला बसायचे. एक-मेकांच्या डब्यातील पदार्थांची देवाण-घेवाण रोजचं होतं. एखादा मित्र नवीन काहीतरी पदार्थ करून आणला असेल आणि लपवून खात असेल तर आम्ही मित्रमंडळी हक्काने त्याचा अख्खा डबा हिसकावून सगळे वाटून खाऊन मोकळे व्हायचो. (सद्या त्याला अपवाद आहे. सोशियल डिस्टन्स) त्यावेळेसचा एक वेगळाच अनुभव होता.

आमची शाळा रोज सकाळी दहा वाजता भरत असे. त्यापूर्वी आम्ही सगळे मित्र ऑफिसमधून चावी आणून संपूर्ण वर्ग साफ सफाई करून शिक्षकांची खुर्ची साफ करून ठेवायचो. चार जण बादली घेऊन सर्वांना म्हणजे फक्त आपल्या वर्गातील मित्रांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी एक-दीड किलोमीटर पायपीट करून विहिरीत उतरून पाणी आणून ठेवायचो. (एका बादलीला मधल्या भागात एक जाड काठी घालुन दोन जण पुढे- दोन जण मागे खांद्यावर उचलून घेता येईल असे) हे काम काही ठराविक विद्यार्थ्यांना ठरवून देण्यात आले होते. जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत पाणी आणण्याचा बहाणा करून शेतात जायचो. त्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. (सद्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फिल्टर पाणी दिलं जातं) सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की, प्रत्यक्ष शाळेत जो आनंद मिळतो तो आनंद सद्याच्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीये. त्यांना सोशियल डिस्टन्सच्या नावाखाली बंधनात अडकविण्यात येत आहे. (मित्रा सोबत खेळायला जाऊ नकोस, त्यांच्याशी हात मिळवणी करू नकोस, मिट्टी मारू नकोस, त्यांच्यापासून लांब बस, त्यांच्या डब्यातील काही खायला जाऊ नको etc) सरळ भाषेत सांगायचे झाले तर “एकट जीवन जगणे” शिकविले जात आहे.

जेव्हा आम्हाला वर्गात शिक्षक तुडवून-तुडवून मारायचे त्याबद्दल आम्ही घरी एक चकार शब्द सांगत नव्हतो. शिक्षकांच्या हातून मार खाल्लेली गोष्ट फक्त आमच्या वर्गातील मित्रांवगळता कोणालाही कळू देत नव्हते. आमचे पालक जेव्हा शिक्षकांना भेटायचे तेव्हा स्वतः शिक्षकच सांगायचे की, परवा तुमच्या पोराला खूपच हाणलं, घरी तुम्ही पण लक्ष द्या असे सांगायचे. तेव्हा आमचे पालक त्या शिक्षकांना आवर्जून सांगायचे की, सोडू नका, अजून कठीणात-कठीण शिक्षा द्या म्हणायचे.

सद्याच्या जमान्यात शिक्षक हक्काने विद्यार्थ्यांना मारायचं लांबच गोष्ट. एक चापट सुद्दा मारू शकत नाही. कारण सद्याचे विद्यार्थी तेवढे सेंटीमेंटल (भावनिक) झालेत. एखाद्या कारणामुळे शिक्षकांनी चापट मारले किंवा रागावले तर काही विद्यार्थी अपमानित झाल्याच्या भावनेतून आत्महत्या देखील केल्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे सद्याच्या घडीला शिक्षक विद्यार्थ्यांवर हात उगारतांना, रागावताना शंभरवेळ विचार करण्याची वेळ आली आहे.

श्री .गुरुशांत माशाळ,
पत्रकार दैनिक संचार, उपसंपादक विश्वन्यूज मराठी डिजिटल,  दुधनी/अक्कलकोट
मो.क्र : 8888627485

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!