दुधनी : कलबुर्गी – कोल्हापूर (गाडी क्र- २२१५५) व सिकंदराबाद – हुबळी (गाडी क्र – १७३२०) या दोन रेल्वे गाड्यांना दुधनी रेल्वे स्टेशनवर थांबा मिळवून देण्यासाठी दुधनी येथील श्री जंगम समाज बहुद्देशीय संस्थेच्यावतीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात सोलापुर रेल्वे प्रबंधकांशी चर्चा करू, असे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी यावेळी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, दुधनी शहर हे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असल्यामुळे कर्नाटकातील आळंद , अफझलपूर तालुक्यात प्रवासी दुधनी स्थानकावरून प्रवास करीत असतात. दुधनीमध्ये शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तसेच बाजारपेठा, बँका, नगरपालिका व इतर सरकारी कार्यालय असल्यामुळे नागरिकांचा दुधनी गावाला रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने वरील दोन गाडीचा दुधनी रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांना दुधनी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावी, अशी विनंती खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी सोलापुर जिल्हा जंगम समाज अध्यक्ष राजशेखर कंदलगंवकर, दुधनी जंगम समाज अध्यक्ष मल्लय्या गौर, उपाध्यक्ष गुरुशांत मठपती, कार्याध्यक्ष गदगय्या मठपती, महानिंगय्या बाहेरमठ, इरय्या पुराणीक, मल्लय्या बाहेरमठ, इरय्या स्थावरमठ व इतर नागरिक उपस्थित होते.