सोलापूर दि.७ : चांगल्या गाण्याला चाल आणि अर्थ दोन्ही असतो. गाणं हे ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. ही किमया गायकाने घडवायची असते. शब्दांचा अर्थ सुरांमधूनही येईल ते गाणं चांगलं.आपल्या तरल, भावस्पर्शी आवाजाने मराठी-हिंदी संगीतक्षेत्रात अजरामर गीते देणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी याच शब्दांत चांगल्या गाण्याची व्याख्या सांगितली.
प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रिसिजन गप्पां’च्या १२ व्या पर्वात त्या बोलत होत्या. गेल्या महिन्याभरापासून रसिकश्रोत्यांची उत्कंठा ताणणाऱ्या या प्रचंड लोकप्रिय तीन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची शुक्रवारी सायंकाळी दमदार सुरुवात झाली. रसिकांच्या सोयीसाठी यंदाचा हा तपपूर्ती सोहळा प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरून ऑनलाईन करण्यात आला.
ख्यातनाम निवेदिका मंगला खाडिलकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून सुमन कल्याणपूर यांचा सांगितिक प्रवास उलगडला. ‘मृदुल स्वरांनी सावळ्या विठ्ठलाचं औक्षण करत नंदाघरी नंदनवन फुलवणारा वाऱ्यावरती लकेरी घेत रिमझिम झरणारा श्रावणसूर म्हणजे सुमन कल्याणपूर.’ अशा यथार्थ शब्दांत मंगला खाडिलकरांनी सुमनताईंचा गौरवपूर्ण परिचय करून दिला.
सुमनताईंचा जन्म कोलकात्याच्या भवानीपूरचा. बालपणी नूरजहाँ, सुरय्या आणि जोहराबाई यांची गाणी त्यांच्या कानावर पडली व त्यांना गोडी लागली.
सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, अरुण दाते, महेंद्र कपूर, बालकराम अशा दिग्गजांसमवेत त्यांनी स्वराविष्कार केला. १९७२ साली अशोक पत्की, अशोक परांजपे आणि सुमन कल्याणपूर यांची पहिली ध्वनीमुद्रिका आली. त्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ‘शुक्राची चांदणी’ या मराठी चित्रपटासाठी पहिलं पार्श्वगायन केलं.
अंगाई गीत आणि सुमनस्वर यांचं अतूट नातं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोरी गाऊनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. लोरी गायनासाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांची पाठ थोपटली. आपल्या खुमासदार शैलीत मंगला खाडिलकर यांनी सुमनताईंच्या सांगितिक प्रवासातील अनेक किस्से रसिकश्रोत्यांसंवेत शेअर केले.
माधुरी करमरकर, विद्या करलगीकर आणि मंदार आपटे या त्रयीने सुमनताईंची गोड गाणी सादर केली. प्रशांत लळीत यांनी संगीत संयोजन केलं. ‘तुझ्या कांतीसम…आकाश पांघरुनी…जिथे सागरा धरणी मिळते…केतकीच्या बनी…नाविका रे…सांग कधी कळणार…सावळ्या विठ्ठला…निंबोणीच्या झाडामागे…कशी करू स्वागता…तुमने पुकारा और हम चले आये…आजकल तेरे मेरे…ना ना करते प्यार…न तुम हमे जानो…ये मौसम रंगीत समा…ठहरिये होशमें…मेरे मेहबूब ना जा…गरजत बरसत…अजहू ना आये…’ अशा एकापेक्षा एक बहारदार गाण्यांची बेधुंद मैफलीतून रसिकांनी ‘सुमनसुगंध’ अनुभवला.
मंगला खाडिलकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून सुमनताईंच्या पाककला, विणकाम, बागकाम या छंदांचाही परिचय झाला. लॉकडाऊनच्या काळात त्यांचा मनमुराद आनंद लुटल्याचं त्यांनी सांगितलं. ‘भावसंगीताच्या क्षेत्रात फुललेला हिरवा चाफा म्हणजे सुमन कल्याणपूर’ अशा अचूक शब्दांत मंगला खाडिलकर यांनी सुमनताईंचा गौरव केला.
सुमन कल्याणपूर या ‘प्रिसिजन गप्पां’मध्ये याव्यात असा प्रयत्न २०१६ सालापासून प्रिसिजन फाउंडेशनकडून केला जात होता. अखेरीस २०२० साली ऑनलाईन गप्पांच्या माध्यमातून हा योग जुळवून आणल्याबद्दल रसिकश्रोत्यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले.
– सुमनताईंचा सोलापूरशी ऋणानुबंध
सुरुवातीच्या काळात सुमन कल्याणपूर यांचा आवाज खूप पातळ आहे या सबबीखाली एचएमव्ही या प्रख्यात कॅसेट कंपनीने त्यांना संधी नाकारली होती. मात्र आपल्या भावस्पर्शी शैलीच्या बळावर सुमनताईंनी मराठी आणि हिंदी संगीतसृष्टी गाजवायला सुरुवात केली. त्यानंतर एचएमव्हीला त्यांचा आवाज हवाहवासा वाटू लागला. त्यांच्या माध्यमातून सुमनताईंनी अजरामर गाणी रसिकश्रोत्यांना बहाल केली. बार्शीचे संगीतकार दशरथ पुजारी यांच्यासमवेत त्यांनी काम केलं. तसंच ख्यातनाम कवी रा. ना. पवार यांनी लिहिलेलं ‘सावळ्या विठ्ठला’ही सुमनताईंनीच स्वरबद्ध केलं. त्यामुळे सोलापूरशी त्यांचा ऋणानुबंध जुळला अशी गौरवास्पद आठवण मंगला खाडिलकर यांनी सांगितली.