एकत्र कुटुंब म्हणजे मोठ्या समाजाचं प्रतिक;’प्रिसिजन गप्पां’मधील प्रकट मुलाखतीत माणिक वर्मांच्या मुलींची भावना
सोलापूर दि. ७ : “माणिक वर्मांनी आम्हा मुलींना कलेसोबतच माणुसकी जपण्याचा आणि नातीगोती सांभाळण्याचाही वारसा दिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना ऍडजस्टमेंट करत माणसांसोबत आनंदाने कसं जगायचं हे शिकवलं. एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं प्रतिक असतं ही भावना माणिकताईंनी आमच्या मनात दृढ केली.याच शब्दात ‘माणिककन्यां’नी आपली आई अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा यांचा वारसा उलगडला. प्रिसिजन फाउंडेशन आयोजित ‘प्रिसिजन गप्पा’च्या १२ व्या पर्वात दुसऱ्या दिवशी ‘माणिककन्यां’नी मारलेल्या दिलखुलास गप्पा रसिकांना ऑनलाईन पाहायला मिळाल्या. माणिक वर्मा यांच्या चारही मुली म्हणजे भारती आचरेकर, वंदना गुप्ते, डॉ. अरुणा जयप्रकाश आणि राणी वर्मा या चार सख्ख्या बहिणींशी उत्तरा मोने यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला.
“मुली आहोत म्हणून स्वतःला कमजोर समजू नका असा कानमंत्र आई-वडिलांनी आम्हाला दिला. ताकदीनं उभं राहून स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच आम्ही चौघीही धडपड्या, जिद्दी आणि डॅशिंग बनलो”, असं ‘माणिककन्यां’नी सांगितलं. राखीपौर्णिमेच्या ऐवजी आम्ही सखीपौर्णिमा साजरी करतो असं सिक्रेटही त्यांनी शेअर केलं.
अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या, ‘चारचौघी’ या माझ्या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग बघायला आई आवर्जून आली होती. प्रयोग संपल्यानंतर नाट्यरसिकांनी माझं कौतुक केलं पण आईने मात्र ‘पाठांतर चांगलं असताना मार्क कमी का पडले’ असं विचारलं.
अभिनेत्री भारती आचरेकर म्हणाल्या, बाई ही २४ तास घरातच असली पाहिजे ही मानसिकताच आमच्या घरी नव्हती. मैफिलींसाठीचे दौरे आणि मुलींच्या गरजा हे दोन्हीही आईने नीट मॅनेज केलं. त्यामुळे संसार करतच करिअरही सांभाळण्याचं बाळकडू मिळालं.
गायिका राणी वर्मा यांनीही माणिकताईंच्या आठवणींना उजाळा दिला. आईच्या गाण्याचा वारसा मला मिळाला पण फार क्लासिकल न गाता तालासुरात गाण्याचा सल्ला तिने दिला. आवाजाप्रमाणेच तिचं मनही निखळ होतं, असं त्यांनी सांगितलं.
इतर तीन बहिणीप्रमाणे कलाक्षेत्रात न जाता वैद्यकीय व्यवसाय निवडणाऱ्या डॉ. अरुणा जयप्रकाश म्हणाल्या, मी आईकडून कलेचा वारसा घेतला नाही पण तिच्या आजारपणात तिची सेवा सुश्रुषा करण्याची संधी मिळाली. आजारपणातून उठल्यानंतर तिला तिच्या पायावर उभा करता आल्याचं समाधान माझ्यातल्या फिजिओथेरपिस्टला मिळालं आहे.
माणिकताईंनी आपल्याभोवतीचं वलय कधीही घरात आणलं नाही. बाईने मैफलीत गाणं ही गोष्ट त्या काळी समाजात स्वीकारार्ह नव्हती पण वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन आणि वर्मा कुटुंबाकडून त्यांच्या कलेची झालेली पाठराखण या बळावरच माणिकताई महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका होऊ शकल्या, असं या चारही बहिणींनी आवर्जून सांगितलं.
पुण्यातील बालपण, तिथं झालेले सांस्कृतिक संस्कार, माणिकताईंची विचारपूस करण्यासाठी अभिनेते दिलीपकुमार यांचा आलेला फोन, रसिकश्रोत्यांकडून मिळालेलं अमाप प्रेम, थोरामोठ्या कलाकारांचा लाभलेला सहवास, प्रत्येक ठिकाणी माणिकताईंना गाण्याचा झालेला आग्रह असे अनेक किस्से ‘माणिककन्यां’नी शेअर केले. माणिकताईंचा कलेचा वारसा पुढे चालविण्यासाठी या चारही बहिणी ‘सिस्टर कन्सर्न’ या प्रॉडक्शन कंपनीच्या माध्यमातून कार्यरत आहेत हे विशेष.
दीड तासांच्या या मनसोक्त गप्पांमध्ये या चारही बहिणींचा खळाळता उत्साह ओसंडून वाहताना बघायला मिळाला. ‘दोन लिंबं झेलू बाई’ असं म्हणत खळाळून हसत भोंडला खेळणाऱ्या या माणिककन्या ‘लाविते निरांजन…’ म्हणताना मात्र आपल्या थोर आईच्या आठवणीने सद्गदित झाल्या. वयाच्या १५ व्या वर्षी पहिलं पार्श्वगायन करणाऱ्या माणिकताई मुलींची झोपमोड होऊ नये यासाठी बाथरूममध्ये रियाज करायच्या, असं गुपितही या मुलींनी उघड केलं.
– ‘प्रिसिजन’ने घडवली चौघींना एकत्र आणण्याची किमया
आम्ही चौघीही कायमच कनेक्टड असतो. पण लॉकडाऊनमध्ये एकमेकींना भेटता आलं नाही. ‘प्रिसिजन’मुळे हा योग जुळून आला असं सांगत ‘माणिककन्यां’नी प्रिसिजन फाउंडेशनचे आभार मानले. या चारही बहिणींची आयुष्यातील पहिली प्रकट मुलाखत ‘प्रिसिजन गप्पा’मध्ये झाली हे विशेष.
– प्रिसिजन पुरस्कारांचे उद्या वितरण
‘प्रिसिजन गप्पां’च्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणेच उत्तुंग सामाजिक कार्य करणाऱ्या दोन संस्थांना गौरविण्यात येईल. भटक्या विमुक्तांना स्थिर करू पाहणाऱ्या गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद (अनसरवाडा ता. निलंगा जि. लातूर) या संस्थेला यंदाचा ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. तसंच वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या प्रार्थना फाउंडेशन (सोलापूर) या संस्थेला यंदाचा ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर या संस्थांचे प्रतिनिधी नरसिंग झरे, अनु व प्रसाद मोहिते यांची प्रकट मुलाखत होईल.