सांगवी बुद्रुक ग्रामस्थांना मिळणार केवळ पाच रुपयांत शुद्ध पाणी; जि. प सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते लोकार्पण
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीकाठी वसलेल्या सांगवी बुद्रुक गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. मात्र सरपंच वर्षा भोसले यांच्या पुढाकारातून अखेर तो मार्गी लागला असून आता आरओ प्लांटच्या माध्यमातून या गावाला शुद्ध पाणी मिळत आहे.
पाच रुपयाला २० लिटर आणि एक रुपयाला १ लिटर अशा पद्धतीने पाण्याचे वितरण सुरू आहे.याठिकाणी बोअर आहेत परंतु टीडीएस मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर सरपंच वर्षा भोसले, मेजर बाळासाहेब भोसले, संजय भोसले, विष्णू भोसले व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व पंचायत समिती सदस्य राजकुमार बंदीछोडे यांच्याकडे निधीची मागणी केली होती.
त्यानुसार त्यांनी प्रत्येकी अडीच लाख याप्रमाणे पाच लाख रुपयांचा निधी दिला होता. त्याचे काम पूर्ण होऊन प्रजासत्ताक दिनी त्याचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सांगवी बु हे गाव २ हजार लोकसंख्येचे आहे. या गावाला शुद्ध पाण्याची गरज होती म्हणून हा निधी दिला, असे तानवडे यांनी सांगितले.एकाच वेळी शुद्ध आणि थंड असे दोन्ही प्रकारे पाणी मिळणार आहे आणि त्यापुढे जावून वाया गेलेल्या पाण्यासाठी पण धोबीघाट बनविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याचे मेजर बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच लक्ष्मण डांगे,जेष्ठ नेते अबूबकर शेख, अंकुश घाटगे, विष्णु भोसले ,विद्वान रेड्डी, प्रदीप सलबत्ते, इरफान शेख, ग्रामसेविका पोमाजी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.