अक्कलकोट, दि.२ : नुकत्याच पणजी गोवा येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजीत मिशन ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे पुण्याच्या मुळ (कुरनुर ता.अक्कलकोट जि.सोलापूर) येथील शाश्वत महावीर कासार याने अंडर-७ वयोगटात शॉर्ट रेस व लाँग रेस मध्ये सहभाग घेऊन कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेकरीता महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक , गुजरात, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.शाश्वतने आतापर्यंत ५ स्पर्धेत भाग घेतला असून त्यामध्ये मिशन ऑलिम्पिक स्टेट स्केटिंग चॅम्पिअनशिप २०२१ कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून त्याने मिशन ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप २०२१ गोवा येथे भाग घेतला होता.
शाश्वतने अवघ्या ३ महिन्याच्या प्रशिक्षणात राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन हे यश संपादन केले आहे. तो हूम मॅक हेनरी मेमोरियल स्कूल मध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकत असून त्याच्या यशाकरिता रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडेमिचे प्रशिक्षक विजय मलजी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.त्याच्या यशाबद्दल कुरनूर ग्रामस्थ व शाळेतर्फे कौतुक केले जात आहे.