ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भटक्या विमुक्तांना, वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार; प्रिसिजन पुरस्कारांचे वितरण, गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद व प्रार्थना फाउंडेशनचा सन्मान

 

सोलापूर दि. ८ : दुर्दशा झालेल्या आपल्याच भारतीय बांधवांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देऊया…तळागाळात वर्षानुवर्षे पिचत राहिलेल्या माणसांना उराशी कवटाळूया…भटक्या विमुक्तांना, वंचित निराधार मुलांना मुख्य प्रवाहात आणूया. असे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांच्या याच निर्धाराच्या साक्षीने ‘प्रिसिजन गप्पां’च्या तपपूर्ती पर्वाचा प्रेरणादायी समारोप झाला. गप्पांच्या १२ व्या पर्वाच्या तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रिसिजन पुरस्कारांचं वितरण झालं. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी तथा संचालक रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा, मयूरा शहा यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला.

गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद (अनसरवाडा ता. निलंगा जि. लातूर) या संस्थेला यंदाचा ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने नरसिंग झरे यांनी स्वीकारला.

सोलापूरच्या प्रार्थना फाउंडेशनला यंदाचा ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपयांचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने अनु आणि प्रसाद मोहिते यांनी स्वीकारला.

पुरस्कार वितरणानंतर प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून या दोन्ही सामाजिक संस्थांनी केलेलं अफाट कार्य उलगडलं.

गुजरातमधल्या द्वारकेत मूळ असणारे आणि स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवणाऱ्या गोपाळ समाजाची गेल्या काही काळात दुर्दशा झाली आणि तो भटका समाज बनला. कसरतीचे खेळ करण्यासाठी अनसरवाड्यात आलेल्या या समाजाशी नरसिंग झरे यांचा संबंध आला. दारिद्र्य, अस्वच्छता, व्यसनाधिनता आणि अंधश्रद्धा याच्या विळख्यात सापडलेली ती माणसं पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. त्यातून गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषदेचा जन्म झाला. झरेंच्या प्रयत्नातून या समाजाला बँडपथकाच्या माध्यमातून पर्यायी रोजगार मिळाला. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांनाही स्वयंरोजगार मिळाला. १०० टक्के मुलं आज शिक्षण घेत आहेत. जीवघेण्या कसरतींपासून सुटका झाली. श्रमदानातून त्यांची घरं झाली. शासकीय कागदपत्रं मिळाली. एकप्रकारे हरवलेलं अस्तित्व पुन्हा गवसलं. चांगल्या प्रकारे जगण्याची इच्छा निर्माण झाली. “अनसरवाड्यात गोपाळ डोंबारी समाजाचं पुनर्वसन नव्हे तर ‘प्रथमवसन’ झालं आहे”, असं नरसिंग झरे यांनी सांगितलं.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या प्रसाद मोहितेनं बालपणापासूनच परिस्थितीने दिलेले चटके सहन केले. व्यवस्थेबद्दलची चीड मनात होतीच. पिचलेल्या शेतकऱ्यांची मुलं त्याचप्रमाणं वंचित, निराधार मुलांसाठी काहीतरी ठोस नियोजनबद्ध करण्याची तळमळ मनात होती. समाजकार्य शाखेची पदवी मिळवत असतानाच समविचारी अनुशी ओळख झाली. आयुष्याचा सहप्रवास याच एका उद्देशाने करण्याचं ठरलं. मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करणं, त्यासाठी त्यांच्या पालकांचा विरोध पत्करून पालावर जाऊन मुलांना शिकवणं, रस्त्यावर खितपत पडलेल्या निराधार माणसांची सेवाशुश्रूषा करणं यावर सुरुवातीला फोकस होता. त्यासोबतच भिक्षामुक्ती अभियान, संवेदनशील कार्यकर्ते गोळा करण्यासाठी ‘कृतिशील तरुणाई शिबीर’ असे पूरक उपक्रमही राबवले. आणखी चांगला परिणाम येण्यासाठी मुलांना स्वतःसोबत ठेवून घेऊन शिकवण्यास सुरुवात केली. पण जागेची मर्यादा अडचणी निर्माण करत होती. रिक्षा चालवत आणि मेसचे डबे देत या मुलांसोबतच स्वतःच्या संसाराचा गाडा ओढणं सुरू होतं. पण निवासी प्रकल्प सुरू केल्याशिवाय अपेक्षित रिझल्ट दिसणार नाही हे लक्षात आलं. त्यामुळे प्रसादनं इर्लेवाडीची (ता. बार्शी) शेतजमीन विकून मोरवंची (ता. मोहोळ) इथं प्रकल्पासाठी हक्काची जागा घेतली. ‘तिथं सुसज्ज असं प्रार्थना बालग्राम उभारण्याचं स्वप्न आहे. हा प्रकल्प म्हणजे निराधार मुलं आणि निराधार वृद्ध यांचं हक्काचं घर असेल’ अशा शब्दांत अनु आणि प्रसाद यांनी आपलं ध्येय स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!