तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.७ : अध्यात्माचे गाढे अभ्यासक तथा जेष्ठ संगीत विशारद डॉ.हेरंबराज पाठक ( वय -५९ ) यांचे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या ( मंगळवारी) सकाळी आठ वाजता अक्कलकोट येथील राहत्या
घरापासून निघणार आहे.पंचायत समिती, अक्कलकोटचे सेवानिवृत्त अधिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी
केली होती.ते एक अध्यात्मिक साहित्याचे अभ्यासक, लेखक ,संगीत तज्ञ,श्री स्वामी समर्थ मंदिरातील धर्म संकीर्तनाचे संयोजक,आकाशवाणीवर अध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग होता.अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या होत्या.सेवानिवृत्तीनंतर शंकरराव पाठक (शास्त्री) यांच्या चरित्रावर आधारित ‘अथ योगिया दुर्लभ ‘, दैनिक संचारमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक लेखांवर आधारित ‘तू सखा आणि मी भक्त’ या तसेच आपल्या नोकरीच्या काळामध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित ‘आठव आठवणींचा’ या त्यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले होते.
अध्यात्म क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या निधनाने अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यामध्ये अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,अशी भावना ह.भ.प गहिनीनाथ महाराज (औसेकर) यांनी व्यक्त केले आहे. अतिशय शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून डॉ.पाठक यांची ओळख होती .त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी व्यक्त केली आहे.त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.