ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर सोशल फाऊंडेशन गुणवंत सोलापूरकरांना सन्मानित करणार

सोलापूर – सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातल्या 75 गुणवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी काल फाऊंडेशनच्या सल्लागारांची आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक झाली. सोशल फाऊंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष बापू देशमुख यांनी या बैठकीस उपस्थित राहून या बाबत मार्गदर्शन केले.

सोलापूर शहराचे नाव देशात आणि परदेशातही उज्ज्वल करणाऱ्या आणि आपल्या क्षेत्रात काही तरी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या 75 तज्ञ व्यक्तींना सोलापूरची श्रीमंती या नावाने पुरस्कार देण्यात यावा असे या बैठकीत ठरवण्यात आले. वैद्यकीय, साहित्यिक, शिक्षण, पर्यावरण, उद्योग, शेती, कला, संगीत, पत्रकारिता, महिला स्वावलंबन, अशा विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात येईल.

येत्या सहा महिन्यात दरमहा काही लोकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. या निमित्ताने सामान्य जनतेलाही आवाहन करण्यात आले असून लोकांनीही आपल्या परिचयातल्या तसेच माहितीतल्या अशा गुणवंत लोकांची नावे सुचवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.त्याकरिता मो.7767080999 यावर संपर्क करावा. त्याच बरोबर कोणत्या क्षेत्रातल्या गुणवंतांना सन्मानित करावे याचीही यादी पाठवावी असे आवाहन निवड समितीतर्फे करण्यात आले आहे.

या बैठकीला संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुभाष (बापू) देशमुख, निवड समिती सदस्य प्रा.डॉ.नरेंद्र काटीकर, डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, अरविंद जोशी, डॉ.जयश्री मेहता, प्रकाश पवार, विठ्ठल मोरे, सुदर्शन सुतार, डॉ. माधवी रायते, डॉ. सुनील हन्द्राळमठ, वैशाली विभूते-गुंड, माऊली झांबरे, डॉ.इ.जा.तांबोळी, नंदकुमार चीतापुरे, हणमंत कुलकर्णी, रवींद्र नाशिककर, ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, सोलापूर सोशल फाऊंडेशन संचालिका मयुरी वाघमारे- शिवगुंडे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!