ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता बघतोच.. कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही ते..मी स्वतः नारळ फोडेन. काम करून घेईन. प्रा. सुरवसे यांनी मांडलेल्या प्रश्नावर पालकमंत्री आक्रमक…

 

अक्कलकोट – (प्रतिनिधी) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील अक्कलकोट दौऱ्यावर होते. या संवाद कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी अक्कलकोट तालुक्यातील खराब रस्त्यांची कैफियत मांडली. उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी महाविकास आघाडी च्या पहिल्या अर्थसंकल्पात बोरगाव परिसरातील रस्त्यांसाठी साडेपाच कोटी चा निधी मंजूर केला होता. त्यानंतरच्या दोन वर्षात टेंडर प्रक्रिया पार पडली आणि जून 2021 मध्ये कार्यारंभ आदेश झाला. पण अद्याप संबंधित दोन्ही ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असून विद्यार्थी, रुग्ण, अबालवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण का होत नाहीत ? ठेकेदारांवर कुणाचा अंकुश नाही का ? ठेकेदार कुणाचे ऐकून काम बंद ठेवत आहेत ? आणि जनतेला वेठीस धरत आहेत ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

यावर बोलताना ना. जयंत पाटील यांनी पालकमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीरपणे दखल घ्यावी अशी सूचना केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे याविषयी बोलताना भलतेच आक्रमक झाले. जिल्हा सरचिटणीस प्रा. सुरवसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून ना. अजित दादांनी मंजूर केलेल्या रस्त्यांची कामे वेळेत होत नसतील तर ते ठेकेदार आहेत, ते बघतोच कसे काम करत नाहीत ते ! मी स्वतः नारळ फोडायला येईन. समोर थांबून काम करायला लावेन.. जनतेच्या सोयीसुविधांसाठी दिलेला निधी वेळेवर खर्च करून लोकांची कामे होत नसतील तर अशा ठेकेदारांची गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील, तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, शहराध्यक्ष मनोज निकम, सरचिटणीस शंकर व्हनमाने, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, युवक शहर अध्यक्ष आकाश कलशेट्टी उपस्थित होते.

 

लवकरच होणार उद्घाटन

ना. जयंत पाटील व पालकमंत्री यांनी सदर ठेकेदारांच्या वेळकाढूपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने कामास सुरुवात करावी असे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात पालकमंत्री यांच्या हस्ते, राष्ट्रवादी च्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन तसेच बोरगाव आरोग्य उपकेंद्राचे उदघाट्न होणार आहे.

प्रा. प्रकाश सुरवसे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!