अक्कलकोट, दि.७ : उजनी धरणाचे पाणी हिळळी बंधाऱ्यापर्यंत सोडावे या मागणीसाठी उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना निवेदन दिले आहे.याबाबत अक्कलकोट तालुका भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. सोलापूर शहरासाठी सध्या उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे.तेच पाणी शेवटच्या हिळळी बंधाऱ्यापर्यंत सोडल्यास आळगे आणि खानापूर,हिळळी हे तिन्ही बंधारे देखील पाण्याने भरून निघणार आहेत.त्याचा फायदा शेतकरी आणि नदीकाठच्या गावांना होणार आहे.उजनी धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत १५ मेच्या पुढे एक आवर्तन सोडण्याचा निर्णय झालेला आहे.परंतु तोपर्यंत नदी कोरडी पडणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत.सध्या भीमा नदीमध्ये १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर पाणी सोडल्यास पुढे पाणी सोडण्याची फारशी गरज पडणार नाही.त्यामुळे आत्ताच पाणी सोडून बंधारे भरून घ्यावेत,अशी आमची मागणी आहे.तसे निवेदन प्रशासनाला दिले असल्याचे उपसभापती हिप्परगी यांनी सांगितले. याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना ही कल्पना दिली असून त्यांच्या मार्फतही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी शेखर
सावळगी उपस्थित होते.