शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थानची संकल्पना सर्वोत्तम ठरेल ; डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांचे साताऱ्यात प्रतिपादन
अक्कलकोट, दि.३ : शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान भूमिपूजन हा महत्वाचा सोहळा असून याची संकल्पना श्री छत्रपती वृषालीराजे भोसले यांची आहे.ज्याप्रकारचे काम स्व.श्री छत्रपती चंद्रलेखाराजे भोसले करत होत्या तोच वारसा श्री छत्रपती वृषालीराजे पुढे नेत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या प्रकल्पाची संकल्पना सर्वोत्तम ठरणार असून हे स्थान स्फूर्ती, श्रध्दा, प्रेरणेचे स्थान ठरेल,असा आशावाद विश्व फाऊंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष प.पू.डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले (महाराज ) यांनी व्यक्त केला. सातारा येथील करंजे-म्हसवे रोडवर असलेल्या अग्निहोत्र मंदिर, करंजे येथे श्री.छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम यांच्या पुढाकाराने शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान साकारण्यात येणार आहे.त्याचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सातारचे माजी नगराध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले, छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या अध्यक्षा छत्रपती वृषालीराजे भोसले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे, राजघराण्यातील आप्तेष्ट आणि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राजीमवाले म्हणाले, छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी कमी वेळात सुंदर संकल्पना मांडली. याठिकाणी भव्य दिव्य स्थान निर्माण होणार असून याठिकाणी येणा-या प्रत्येकाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.याबरोबरच याठिकाणी अन्नदान, गोपालन, कृषी उपक्रमांचे ट्रेनिंग सेंटर असे विविध उपक्रम सुरु करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यांच्या काम बघून मला स्व.छत्रपती चंद्रलेखाराजे भोसले यांची आठवण येते. त्यांच्याप्रमाणेच वृषालीराजे भोसले यांच्याकडून समाजकल्याण व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास अभ्यासक प्रा.संभाजीराव पाटणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यांचा इतिहास सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना कशाबरोबरही करता येणार नाही. त्यांचे कार्य बघितले की मरगळ दूर होते, प्रोत्साहन मिळते. त्यांचे हेच कार्य या प्रकल्पातून शिवप्रेमींसमोर येणार आहे. ही सर्वांसाठी वैभवशाली वास्तू ठरेल. सातारच्या ऐतिहासिक महत्व, गतवैभव पुन्हा निर्माण होत असल्याचा आनंद आहे. त्यासाठी वृषालीराजे भोसले यांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. त्यांचे शिवकार्य असेच पुढे चालत राहू दे, अशी अपेक्षा व्यक्त केले.प्रारंभी कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी अग्निहोत्र मंदिराची पाहणी केली. त्यानंतर कार्यक्रमस्थळी पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर भूमिपूजन सोहळा आणि प्रकल्पाच्या कोनशीलेचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी दुर्गसंवर्धनासाठी काम करणा-या विविध संस्थांचा, व्यक्तींचा, प्रकल्पासाठी योगदान देणा-या व्यक्तींचाही सत्कारही करण्यात आला.प्रास्ताविक छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केले.कार्यक्रमास राजघराण्यातील आप्तेष्ट, शिवप्रेमी, सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधामचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाहुनगरी फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.