अक्कलकोट, दि.८ : ऐन उन्हाळ्यात अक्कलकोटकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.विजेच्या अडचणीमुळे शहराला सध्या आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत
असून नागरिक या समस्येने पुरते हैराण
झाले आहेत.निवडणुका तोंडावर
आहेत तरीही हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने हा प्रश्न ‘जैसे थे’ दिसून येत आहे. पावसाळा ,हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतुमध्ये शहरात पाण्याची टंचाई असते. परंतु ती कमी-अधिक प्रमाणात असते.उन्हाळ्यात मात्र ती प्रकर्षाने जाणवते.सध्या कुरनूर धरणांमध्ये मुबलक पाणी आहे तरीही जॅकवेल साठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर योजना नसल्याने उपसा मागणी प्रमाणे होऊ शकत नाही.यासाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा सुरू
आहे, असे पालिकेकडून सांगितले जाते.
परंतु त्याला मंजुरी कधी मिळणार हा
खरा प्रश्न आहे. सांगवी जलाशयातून देखील पाणी उपसा केला जातो. दोन्ही ठिकाणाहून रोज ४० ते ४५ लाख लिटर पाण्याचा
उपसा होतो परंतु विजेच्या अडचणीमुळे
प्रशासनाच्या मते सहा ते सात दिवसाड
आणि नागरिकांच्या मते आठ ते दहा दिवसांड
पाणी हे शहरवासीयांना मिळत आहे.
सध्या पालिकेवर प्रशासक आहेत अशा परिस्थितीत कोणी या स्थितीकडे लक्ष
द्यायला तयार नाही. सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत
परंतु पाणी प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर
बनत चालला आहे.अक्कलकोट शहराला तसे पाहिले तर चार पाणीपुरवठा योजना आहेत परंतु दोन योजना या निकामी आहेत आणि दोन योजना चालू आहेत.हिळळी योजना तरी वर्षानुवर्षांपासून बंद पडली आहे.हालचिंचोळी योजना पण गेली अनेक वर्ष दुरुस्ती अभावी बंद आहे फक्त सांगवी आणि कुरनूर या दोन योजनेवरच अक्कलकोटचे भवितव्य अवलंबून आहे. उजनीतून पाणी सोडल्यामुळे सध्या हिळळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे परंतु या ठिकाणाहून पाईपलाईन अभावी पाणी
मिळू शकत नाही. कारण ते अक्कलकोट जलवाहिनी ती पूर्णपणे नादुरुस्त आहे. मध्यंतरी नवीन योजना साकारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता परंतु तोही पाठपुराव्या अभावी बारगळला आहे त्यामुळे हा प्रश्न आणखीनच दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अक्कलकोट शहरातील नागरिक गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पाणीटंचाईने हैराण आहेत यावर कायमचा उपाय म्हणून प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांनी एखादी चांगली मोठी योजना आणून हा प्रश्न मार्गी लावावा,अशी अपेक्षा नागरिकांची आहे. सत्ता कोणाचीही येवो, पाण्याची समस्या मात्र अक्कलकोटमध्ये ठरलेली आहे, अशी चर्चा नागरिकातून सुरू आहे.
महिला वर्गातून
तीव्र संताप
उजनीतून पाणी सोडल्यामुळे हिळळी
बंधारा ओव्हर फ्लो आहे.कुरनूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे अशा स्थितीमध्ये
‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी स्थिती अक्कलकोटकरांची झाली आहे.
ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सतावत असल्याने महिला वर्गातून संताप
व्यक्त होत आहे.