राज्य सरकारच्या अभिनंदनासाठी सकल मराठा समाज आणि नौकरीच्या नियुक्त्या मिळालेले उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक; शिंदे सरकारकडून आता मराठा आरक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्षा
सोलापूर – राज्य सरकारच्या धाडसी निर्णयामुळे मराठा समाजातील विविध खात्याअंतर्गत शासनाकडून १०६४ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातील १०२ मुले आणि मुली यांना शनिवारी महावितरणकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना नोकरीमध्ये न्याय मिळाला असल्याचे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे मिठाई वाटून स्वागत करण्यात आले .तसेच जल्लोषही करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर यावेळी पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले.२०१४ आणि २०१९ मध्ये नोकरीच्या प्रतीक्षा यादीत असलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी महाराज यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून हे सर्व मुली आणि मुली कामावर रुजू होत असून राज्य सरकारचे आभार मानावे तितके कमीच आहेत. मराठा समाजातील मुला-मुलींना न्याय मिळवून देण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संभाजी महाराजांचा मोठा वाटा आहे. जसा या उमेदवारांच्या नोकरीचा निर्णय घेतला तसाच मराठा आरक्षणाचा सुद्धा निर्णय घेऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याबाबत शिंदे -फडणवीस सरकारने निर्णय घ्यावा, महाराष्ट्रातील मराठा समाज सरकारच्या पाठीशी उभारल्याशिवाय राहणार नाही, असे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठा समाजातील या १ हजारहून अधिक युवक युवतींची हरवलेली भाकरी सरकारने मिळवून दिल्याबद्दल ही त्यांचे अभिनंदन करण्यात आले .एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री लाभल्यामुळेच या १ हजारहून अधिक युवक युवतींना नोकरी मिळाली असल्याचे राजन जाधव यांनी सांगितले. या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यापूर्वीची सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी वीज वितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे कष्ट घेतले ते आपण कधीही विसरणार नसल्याचेही जाधव यावेळी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा असल्याचेही राजन जाधव यांनी सांगितले.
आजपर्यंत आपण शासनाच्या विरोधात कायमच आंदोलन करत राहिलो. आज मात्र खऱ्या अर्थाने शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये न्याय मिळाल्याचा आजचा हा आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मराठा समाजाला आरक्षण देणे काळाची गरज असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले.
यावेळी महावितरणचे अभियंता दिघे यांच्यासह ……. उपस्थित होते.