ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जनगणनेसाठी सरकारला जागे करा, सरपंच वनिता सुरवसे यांनी दिले आण्णा हजारे यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२७ : गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी राळेगणसिध्दी येथे आयोजित सरपंच परिषदेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त गेले असता ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन गावातील विविध कामाबाबत व त्वरित जनगणना होण्याबाबत निवेदन दिले.

जनगणना होऊन बारा वर्षे लोटली, परंतु आज पर्यंत भारत सरकारच्या माध्यमातून जनगणना करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना फटका बसत आहे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या व जिल्हा परिषदेच्या विविध योजना, दलित वस्ती निधी, पंधरा वित्त आयोग, अशा अनेक योजनेमार्फत जो निधी दिला जातो तो निधी लोकसंख्येच्या निकषावर दिला जातो, परंतु २०१० नंतर आज आज पर्यंत जनगणना झाली नाही. जनगणना झाली नसल्यामुळे २०१० च्या लोकसंख्येच्या आधारे सर्व ग्रामपंचायतींना निधी वाटप केला जातो त्यामुळे सर्व ग्रामपंचायतचे किमान ३० ते ४० टक्के नुकसान होत आहे. त्यामुळे गावच्या विकास कामावर मोठा परिणाम होत आहे. कारण २०१० च्या तुलनेमध्ये २०२२ ची प्रत्येक गावातील लोकसंख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे.

नियमाप्रमाणे २०२० साली जनगणना होणे अपेक्षित होते परंतु कोरोनामुळे जनगणना पुढे ढकलली, पण आत्ता त्वरित जनगणना करून २०२० पासून प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांचा राहिलेला फरक व चालू निधी नवीन जनगणण्याप्रमाणे देण्यास सांगावे, याकरिता जेष्ठ समाजसेवक हजारे यांना सरपंच सुरवसे यांनी विनंती केली. वेळोवेळी ग्राम विकास मंत्री, पालकमंत्री यांना तीन तीन चार चार वेळा भेटून सुद्धा गावासाठी निधी मिळत नाही सर्व सरपंचांची काम करण्याची इच्छा असते पण त्यासाठी मुंबईच्या पायऱ्या झिजवल्या तरी सुद्धा कुठेही आराखड्यात गावच नाव दिसत नाही, सरपंचांच्या पत्रास मंत्रालयात काही किंमत नाही. कृपया करून त्यांच्या हक्काचा निधी तरी सर्व सरपंचांना मिळवून द्यावा, अशी विनंती सुरवसे यांनी हजारे यांच्याकडे केली आहे.

अण्णांनी सरपंच सुरवसे यांचे पत्र स्वीकारून तात्काळ पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला स्वतः पत्र देणार असे आश्वासन दिले. यावेळी मधुकर सुरवसे, सरपंच परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अश्विनी थोरात उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!