कराड : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यात गेल्या दहा वर्षांपासूनचे संपत्तीचे विवरण द्यावे, त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असे नमूद करण्यात आले आहे. पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता मला ही नोटीस आली आहे. त्याचे मी रितसर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. या नोटीसनंतर याबाबत पृथ्वीराज चव्हाणांकडून योग्य ती कार्यवाही सुरु केली आहे.
“दिवाळीच्या शुभमूर्हतावर मोदी सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाने मलाही एक नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक नोटीस शरद पवारांना पाठवली होती. इन्कम टॅक्स विभाग हा केंद्राचा विभाग आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना अशाप्रकारे नोटीस पाठवल्या जातात. भाजपच्या कोणत्या नेत्याला नोटीस पाठवली आहे, याची माहिती नाही. मी मला पाठवलेल्या नोटीसला रितसर उत्तर देईन. ही रेगुल्यर नोटीस आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
“सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, हे भाजपला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. केंद्रातील भाजपा सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस पाठवत आहे,” असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.