मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या मंत्र्यांमध्येही ताळमेळ नाही. या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या घोषणाही हवेतच विरल्या आहेत, असं सांगतानाच प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवलं जातं, हे चुकीचे आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
कोरोना काळात केंद्र सरकारने औषधांपासून ते धान्यांपर्यंत सर्व काही राज्याला दिलं. या सरकारने काय केलं? स्वत:च्या ताकदीवर तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर अकृत्रिमपणे जोडतोड करून सरकार आणलंच कशाला? तुम्हाला सरकार चालवता येत नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला. राज्याला 1 लाख 65 कोटीचं कर्ज काढता येऊ शकतं. पण यांना सर्व केंद्राकडून हवं आहे, असं सांगतानाच प्रत्येकवेळी केंद्रावर खापर फोडणं योग्य नाही, असंही ते म्हणाले. या सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं. निम्मे पैसे दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय झाला. पण पैसे दिलेच नाहीत. त्यामुळे वीज बिलाचे पॅकेज घोषित करून काय होणार आहे. प्रत्यक्षात पैसे मिळणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.
पालघरप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी
यावेळी पाटील यांनी पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. आकसाने चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे दिलं आहे. सीआयडी चौकशी लावून सरकार त्यांच्या लोकांना वाचवू पाहत असून इतरांना अडकवत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, असं स्थानिकांचं म्हणणं आहे, असं सांगतानाच या प्रकरणाचा तपास नीट होत नसेल आणि ते प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी राम कदम आंदोलन करत असतील तर त्यात बिघडलं कुठे? असा सवालही त्यांनी केला.