अक्कलकोट, दि. १ : माया, ममता, करुणा, दयासागरेचा अखंड झरा अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त स्वरूपात आहे. ज्या-ज्यावेळी स्वामींची मुद्रा डोळ्यांसमोर येते त्यावेळी स्वामी दर्शनाची प्रचीती होत असते. त्यामुळे मनन, चिंतन, श्रवणातून झालेले श्री स्वामी समर्थांचे स्मरण हे स्वामींच्या मूर्त स्वरूपामुळे भक्ती वात्सल्यात परिवर्तित होते. भक्तीच्या या अविष्कारातून आपण स्वामींच्या मुद्रेत भक्ती वात्सल्याचे स्वरूप पाहतो असे मनोगत भारतीय प्रशासन सेवेतील सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी शंभरकर बोलत होते.
पुढे बोलताना शंभरकर यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान स्वामी समर्थांचे मूळस्थान असून राज्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिरात होत असलेले विविध कामकाज हे भाविकांच्या सोई सुविधांना प्राधान्य देत मंदिर समिती कार्य करीत असून भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची सुरू असलेली वाटचाल पाहून समाधान वाटले. मंदिरातील गाभारा नूतनीकरण, परिसर सुशोभीकरण, स्वच्छ व सुंदर मंदिर परिसर पाहून स्वामींच्या या पवित्र स्थानास भविष्यात वेळोवेळी भेट देण्याचे प्रसंग जीवनात यावे असे भावोद्गार काढले, तसेच स्वामी सेवेच्या माध्यमातून मंदिर समितीस नेहमीच सहकार्य करू असे मनोदय व्यक्त करून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, भारत सरकारचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुशराव चव्हाण, क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव, नायब तहसीलदार विकास पवार, जिल्हा माहीती कार्यालयाचे अमित खडतरे, विश्वस्त महेश गोगी, भारत सरकार डी.आर.डी.ओ.चे वैज्ञानिक व अक्कलकोट चे सुपूत्र भिमाशंकर गुरव, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ व अन्य सेवेकरी तथा भक्तगण उपस्थित होते.