ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ

पुणे : गेल्या आठवड्याभरापासून डाळ आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आता अचानक खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. खाद्यतेल चार ते पाच रुपयांनी महागलं आहे. १५० ते १७० रुपये प्रतिलिटर किंमतीत मिळणारं खाद्यतेल आता १७५ ते १८५ रुपयांना मिळत आहे. त्यामुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानं या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहे.

गेल्या आठवड्याभरापासून तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय उडीद डाळीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळं ठोक बाजारासह किरकोळ बाजारावरही या दरवाढीचा परिणाम जाणवू लागला आहे. यावर्षी अतिवृष्टीनं डाळींचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं अचानक डाळींच्या भावात वाढ होत असल्याचं माहिती आहे. त्यामुळं आता याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्याचबरोबर शेतमाल आणि भाज्याची महागल्या आहेत. सीएनजीच्या दरवाढीमुळं दळणवळणाचा खर्च वाढलाय. त्यामुळंच पालेभाज्यांचे दर वाढल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!