लम्पीसाठी साखर कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना
सोलापूर,दि.13 : जिल्ह्यात लंम्पी आजाराची जनावरे वाढत आहेत. पशुपालकांनी गायवर्गीय जनावरांची काळजी घ्यावी. जिल्ह्यात खाजगी आणि सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊसतोडणी कामगार बैलगाड्यांसोबत, गायी, म्हैशींसह येत आहेत. यामुळे येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी कारखाना प्रशासनाने करावी, यासाठी सर्व साखर कारखान्यांनी एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या.
नियोजन भवन येथे जिल्ह्यातील लम्पी आजाराबाबत आयोजित बैठकीत श्री. स्वामी बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, प्रादेशिक उपसंचालक (साखर) पांडुरंग साठे, पशुसंवर्धन उपायुक्त तथा जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ. ज्योती परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे उपस्थित होते. ऑनलाईनद्वारे सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात लम्पी आजाराने 55 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 38 गाय तर 17 बैलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 93.29 टक्के जनावरांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित जनावरांचे आठवड्याभरात लसीकरण होईल, याचे नियोजन करावे. प्रत्येक साखर कारखान्यांनी उसतोडणीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमावा. त्यांचा संपर्क क्रमांक तातडीने सर्वांना द्यावा. शिवाय कारखान्यांनी निवडक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना तपासणीसाठी नियुक्त करावे.
जिल्ह्यात येणारी बैल/गायी यांचे लसीकरण झाल्याचे तपासून खात्री करूनच प्रवेश द्यावा. तपासणीमध्ये त्या जनावरांना लस देऊन 21 दिवस झालेले असावे. 21 दिवस झाले नसल्यास अशा जनावरांना त्वरित कारखाना परिसरातील विलगीकरण कक्षात ठेवावे. यासाठी विलगीकरण कक्ष तयार करावा, यासाठी साखर कारखाना प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. संपर्कात राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही श्री. स्वामी यांनी केल्या.
कारखान्यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी प्रवृत्त करा- शमा पवार
सध्या शासनाकडून ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात काय पीक घेतले हे ॲपच्या माध्यमातून स्वत: पिकाची नोंद करता येणार आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. साखर कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र ऑनलाईन होईल, यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. ई-पीक पाहणीचे नवीन ॲप व्हर्जन आले आहे. यामुळे स्वत:च्या शेतात, पिकात जावून फोटो काढून अपलोड करता येतो. यामध्ये गट कोणता हेही ॲपवर समजणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.साखर कारखान्यांच्या कृषी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्कात राहून ई-पीक पाहणी करण्यासाठी पुढे यावे. कृषी अधिकारी, चीटबॉय यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जागृत करावे. याबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.
डॉ. सोनवणे यांनी जिल्ह्यातील लम्पी आजाराबाबत माहिती दिली. श्री. साठे यांनी साखर कारखान्यांना विविध सूचना केल्या.