दिल्ली : महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात २९ नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आजच्या सूनवणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते मात्र विलंब झाल्याने पुन्हा निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान घटनापीठाने ठाकरे व शिंदे गटाला तोंडी युक्तिवाद न करता लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले. यावर दोन्ही गटांनी युक्तिवाद व संबंधित कागदपत्रे सादर करण्यात चार आठवड्यांची मुदत द्यावी, अशी विनंती घटनापीठाला केली. घटनापीठाने ही विनंती मान्य केली. त्यानंतर पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर २९ नोव्हेंबरला होईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले आहे.
आजच्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद केले जाण्याची शक्यता होती. मात्र, सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने तोंडी युक्तिवाद ऐकण्यास नकार दिला. बंडखोर आमदारांचे निलंबन, शिंदे सरकारची वैधता आणि विधानसभा अध्यक्ष तसेच राज्यपालांचे अधिकार अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे गट तसेच शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत.