अक्कलकोट, दि.12 : श्रीक्षेत्र अक्कलकोटला पंढरपूरच्या धरतीवर तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत पाहणी व नव्याने करावयाच्या उपाया योजना यासाठी नगरविकास, पर्यटन, विधी व न्याय, सार्वजनिक बांधकाम, महसूल गृह विभागाचे मंत्रालयीन उच्चस्तरीय अधिकारी दौर्यावर येणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली आहे.
दिपावली सुट्टीनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोटला झालेल्या प्रचंड गर्दीचा परिणाम यामुळे स्वामी भक्तांना झालेला त्रास याबाबतची दखल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतली आहे. त्यामुळे निश्चितच आगामी काळात स्वामी भक्तांना त्रास होणार नाही अशा पध्दतीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन त्यावर तातडीने अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे दिपावळी गर्दीचा अक्कलकोटमध्ये आलेल्या भाविकांमध्ये मंत्रालयातील विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना याचा फटका बसल्याने वरिष्ठ पातळीवरुन तीर्थक्षेत्र विकासाबाबत मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांना देखील गर्दीच्या काळात झालेल्या त्रासाबाबत शासन जागे झाले आहे.
राज्यातील शिर्डी, शेगांव, पंढरपूर, तुळजापूर आदी प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी श्रीक्षेत्र अक्कलकोट हे मात्र वरील तीर्थक्षेत्राप्रमाणे विविध विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे. यामध्ये श्री वटवृक्ष स्वामी मंदिर, समाधी मठ या ठिकाणी रुंदीकरणाची आवश्यकता आहे. त्याशिवाय भक्तांना दर्शन, वाहनतळ, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सोय, दर्शन रांग, रिंगरोड व जागा आरक्षण, पालखी मार्ग, भूसंपादन आदी विषय कळीचा मुद्दा ठरत आहे.
दररोज वाढत चाललेली गर्दी पाहता वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. वाराणसीच्या धरतीवर पंढरपूर दोन टप्प्यात कॉरीडॉर होत आहे. तर श्रीक्षेत्र अक्कलकोट हे त्याच धरतीवर होणे अपेक्षित आहे. हे सर्व करीत असताना स्वामी भक्त व स्थानिक नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत नव्याने कामे समाविष्ट व्हावी, अशी मागणी देखील जोर धरत आहे.
श्रीक्षेत्र अक्कलकोटला राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात आल्याने स्वामीभक्तांना कमीतकमी वेळेत श्रीक्षेत्र अक्कलकोटला पोहोचू लागले आहेत. या बरोबरच महाराष्ट्रासह अन्य राज्यातील परदेशातील स्वामीभक्तांचा लोंढा वाढत आहे. दर गुरुवार, सलग सुट्या, शनिवार-रविवार सुट्टी, सण, उत्सव, प्रकटदिन, पुण्यतिथी सोहळा, दिपावली, उन्हाळी सुट्टी, कार्तिक पौर्णिमा, श्रीदत्त जयंती, गुरुपौर्णिमा, आषाढी, कार्तिकी एकादशी, नियमित पडणारी गर्दी अशा काळात स्वामी भक्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा त्रास मंत्रालयीन, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना बसल्याने या बाबतची दखल विविध विभागाने घेतलेली आहे. यावरुन तीर्थक्षेत्र विकासाला आता चालना मिळून येत्या काही वर्षातच तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.