अक्कलकोट शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू,पहिल्या दिवशी ११ जनावरे गो शाळेत जमा : मुख्याधिकारी
अक्कलकोट : अतिक्रमण मोहिमेपाठोपाठ आता अक्कलकोट शहरात मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. शुक्रवारी अकरा गोवंश जातीच्या जनावरांना गोशाळेत जमा करून कारवाई केल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे. अक्कलकोट शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे.यामुळे शहरातील भाविकांना मोठा त्रास होत आहे तसेच छोटे-मोठे अपघात देखील होत आहेत.
यामुळे कुणाचे हात मोडणे, पाय मोडणे असे प्रकारही वारंवार दिसून येत आहेत. त्यामुळे पालिकेकडे तक्रारीचा सूर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण मोहिमेबरोबरच आम्ही मोकाट जनावरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी आजपासून मोहीम हाती घेतली आहे. ज्या जनावरांना पकडले होते. त्या पालकांनी पालिकेत येऊन विरोध केला परंतु आम्ही तो जुमानणार नाही.अजूनही आम्ही संधी देतो, ज्या पालकांची जनावरे शहरात मोकाटपणे फिरत आहेत. ज्याच्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. त्या पालकांनी तातडीने आपली जनावरे अक्कलकोट शहराच्या बाहेर नेऊन पालन पोषण करावीत अन्यथा आजच्या कारवाईप्रमाणे थेट गोशाळेत जमा करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली आहे. या कारवाईने गोपालकांचे धाबे दणाणले आहेत. तर अक्कलकोट शहरातील नागरिक व भाविकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
अतिक्रमण मोहीम पुन्हा मंगळवारपासून सुरू
येत्या मंगळवारपासून अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू करणार आहे मी स्वतः अन्य कामात थोडा व्यस्त असल्यामुळे या मोहिमेला काही अंशी ब्रेक लागला आहे परंतु पुन्हा नव्या जोमाने पोलीस बंदोबस्तात येत्या मंगळवारपासून शहरातील कारवाई तीव्र करणार आहे.यासाठी पुन्हा एकदा अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली आहे – सचिन पाटील, मुख्याधिकारी