मुंबई : सुक्षेत्र श्रीशैल येथे श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे द्वादश पीठारोहण व जन्म सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजित राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विभागाचे स्वागताध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
शनिवारी, मुंबई येथे नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आमदार कल्याणशेट्टी,
मैंदर्गीचे निलकंठ शिवाचार्य महास्वामी, कांतप्पा धनशेट्टी आदी शिष्टमंडळातील सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना भेटून निमंत्रण दिले. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दि. १० ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलनच्या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
सध्या श्रीशैल पिठाचे जगद्गुरूंचे येडूर ते श्रीशैल असे ५६० किलोमीटरचे पदयात्रा चालू असून ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा श्रीशैल येथे पोहचणार आहे. दरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. श्रीशैल येथे दि.१ डिसेंबर ते १० जानेवारी पर्यंत जगद्गुरुंचे ४१ दिवसांची धार्मिक अनुष्ठान, रुद्रहोम,इष्टलिंग महापूजा, जगद्गुरुंच्या लिंगोद्भव मूर्तीचे बिल्वार्चन, धर्म प्रबोधन, तुलाभार कार्यक्रम व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दि.१० ते १५ जानेवारी या पाच दिवशी राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन, राष्ट्रीय वीरशैवागम समावेश, तेलगू, मराठी, कन्नड भाषा बंधुत्व कार्यक्रम, भक्तनिवास ,हॉस्पिटल महासभामंडप, वसती शाळा, संस्कृत गुरुकुल यांचे पायाभरणी कार्यक्रम, हिंदी, इंग्रजी, तेलुगु भाषेत अनुवादित केलेले सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांच्यासह देशभरातील विविध मान्यवर येणार असल्याची माहिती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.