मारुती बावडे
सोलापूर, दि.१४ : बऱ्याच दिवसांपासून सोलापूर व सोलापुरातील सर्व मित्रमंडळी, माझे सहकारी, मला भरभरून प्रेम दिलेले सोलापुरातील सर्वच नागरिक यांना निरोपाची पोस्ट लिहिण्याचं मनात होतं पण मन धजावलं नाही….. नुकतेच मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून हजर झाले तेव्हा कुठे सोलापूरला निरोप द्यायची मनाची थोडीशी तयारी झाली,असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दोन वर्ष मी सोलापूर ग्रामीण येथे काम केले, सोलापूरन मला खूप काही शिकवलं. उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठुरायाची आणि सर्व वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी पंढरपूर वारीच्या निमित्ताने मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली. पुणे जिल्हा, सातारा जिल्हा येथे काम केल्यावर सोलापूर जिल्ह्यात माझा वारी मार्गच एका अर्थाने पूर्ण झाला. सोलापूर हा अनेक भाषा, संस्कृती, खाद्य परंपरा, वेशभूषा आणि इतर अनेक अर्थांनी मला कायमच एक मेल्टिंग पॉइंट वाटत आलेला आहे. मी आतापर्यंत काम केलेल्या ठिकाणांपैकी सर्वाधिक विविधता मला सोलापुरात पाहायला मिळाली.
सोलापूर मधली साधी ,प्रेमळ माणसं मला खूप भावली.सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने गेल्या दोन वर्षात राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन, ग्राम सुरक्षा यंत्रणा, बालविवाह मुक्त जिल्हा ही मोहीम, या आणि अशा अनेक उपक्रमांना सोलापूरकरांनी खूप सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळोवेळी आमचं मनोबल उंचावलं.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील माझा दोन वर्षांचा कालावधी हा सोलापूरकरांच्या सहकार्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या डेडिकेशन ने केलेल्या कामामुळे कायमच आनंदी आठवणीच्या रूपाने माझ्या चिरंतन स्मरणात राहणार आहे. त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.मी काम केलेल्या जळगाव, जालना, पुणे, सातारा यांच्यासोबतच आता सोलापुरही कायम माझ्या प्रार्थनेत असेल,असे मावळत्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी म्हटले आहे.