अक्कलकोट, दि. १५ : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची सुरक्षितता वाढावी आणि त्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी धोत्री येथील गोकुळ शुगरने ‘सुरक्षित वाहन, सुरक्षित ऊस वाहतूक’ असा अभिनव उपक्रम राबवला आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या ज्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर अथवा लाल रंगाचा कापडी फलक नसेल, अशा वाहनांना वजन काट्यावर प्रवेश देणार नाही, असा आदेश गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने काढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची सुरक्षितता वाढली आहे.
ऊस वाहनांना वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनी अतुल भोसले यांच्या हस्ते रिफ्लेक्टर आणि पाठीमागे लाल कापडी फलक लावण्यात आले. कारखान्याच्या सर्वच वाहनचालकांना हेडफोन वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. वाहतूक करताना टेप रेकॉर्ड वाजवता येणार नाही. यंदाचा गळीत हंगाम अपघातमुक्त करावा,असे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे यांनी यावेळी वाहनचालकांना केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक कपिल शिंदे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, जनरल मॅनेजर प्रदीप पवार, शेतकी अधिकारी रामचंद्र शेंडगे, फकरोदिन जहागीरदार, कार्तिक पाटील, विमानतळ प्राधिकरणचे सज्जन निचळ, महेश माने, व्यंकट मोरे, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.