ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूरच्या हजरत पीर यात्रेला उद्यापासून प्रारंभ; तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

अक्कलकोट,दि.१६ : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेला गुरुवार दि.१७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही तारीख ठरविण्यात आली होती. यात्रेनिमित्त तीन दिवस गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.१७ रोजी गंध,शुक्रवार दि.१८ रोजी नैवैद्य, दंडवत आणि शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी कुस्त्या व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता व्हि.एम ग्रुपच्यावतीने ‘लावण्यरंग’ हा मराठमोळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उदघाटन गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

शनिवारी दोन कार्यक्रम आहेत यात राहुल काळे युवा मंच ‘लावण्यखणी’ तर अमरप्रेमी युवा मंच कुरनूर तर्फे लावण्यखणी व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन केले असून या दोन्ही कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. कुरनूरची यात्रा ही सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान मानली जाते. शेकडो वर्षाची परंपरा यात्रेला आहे.याठिकाणी हिंदू-मुस्लिम भाविक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात त्यामुळे या यात्रेकडे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली होती यावर्षी मोठ्या स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तरी यात्रेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सरपंच व्यंकट मोरे व यात्रा पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!