ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिंदखेड, बावकरवाडी रस्त्यावर ‘खड्डे चुकवा बक्षीस मिळवा’ ; रस्त्याच्या समस्येने नागरिक वैतागले

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट आणि बावकरवाडी ते चपळगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यामुळे अक्षरशः नागरिक होरपळून निघत आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. इतकी भयानक अवस्था या रस्त्यांची झाली आहे. या रस्त्यावर गाड्या चालवणे तर सोडा चालणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याला मंजुरी आहे काम होईल अशीच आश्वासने देण्यात येत आहेत. पण प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार हे कोणी सांगत नाही.

हे दोन्ही रस्ते अवघ्या तीन ते चार किलोमीटरच्या आहेत पण ते तालुक्याला जोडणारे असल्यामुळे बावकरवाडी, कुरनूर, चपळगाव, मोट्याळ आणि सिंदखेड ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहेत. अक्कलकोट ते सिंदखेड या रस्त्यावर १० ते १५ खड्डे असे पडले आहेत की ‘ते’ दिसले की ब्रेक दाबावा कि गाडी सोडून द्यावी अशा विचारातच गाडी खाडकन खड्ड्यात अशी आदळते कि ठेकेदार व प्रशासनाच्या नावाचा उद्धार केला जात आहे. या भागातील सर्व पर्यायी रस्त्यांची अवस्था ही अशाच स्वरूपात आहे त्यामुळे कोणत्याही रस्त्यावरून जा तुम्हाला खड्ड्यावरून जाण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था या भागात निर्माण झाली आहे. याबाबत या भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

जनता आंदोलनाच्या तयारीत

चपळगाव भागातल्या सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे त्यातल्या त्यात बावकरवाडी ते चपळगाव आणि सिंदखेड ते अक्कलकोट या रस्त्यावर तर आता ‘खड्डे चुकवा आणि बक्षीस मिळवा’ अशी स्पर्धा आम्ही ठेवणार आहोत इतकी भयानक अवस्था या रस्त्यांची झाली आहे. लवकरच यावर उग्र आंदोलनाच्या तयारीत आम्ही आहोत – व्यंकट मोरे, सरपंच कुरनूर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!