अक्कलकोट – येथील श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त आहोत. नेहमी नसले तरी आज अनेक दिवसांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा योग आला. गाभारा सुशोभिकरण व नूतनीकरण यानंतर वटवृक्ष मंदिराची भव्यता पाहून आपण भारावलो असून त्यामुळे येथे आल्यानंतर मन नेहमीच प्रफुल्लित होते असे मनोगत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना लोहिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना लोहीया यांनी स्वामी दर्शनाकरिता अनेक वर्षापासून येथे येत असतो. देवस्थानचे तत्कालीन चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांनीही अनेक विकासाभिमुख बदल घडवून स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, परिणामी अक्कलकोटला स्वामी भक्तांची संख्या वाढत गेली. आज त्यांचे चिरंजीव महेश इंगळे हे देखील वेळोवेळी स्वामी भक्तांना विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. गतवेळेत मी उन्हाळ्यात येथे आलो होतो. प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या भाविकांना वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीने वातानुकुलित परिसर उपलब्ध करून स्वामी भक्तीचा गारवा अनुभवण्यास उपलब्ध करून दिला. गाभारा सुशोभिकरणानंतर पुरातन गाभाऱ्यातून स्वामी दर्शन होत असल्याने वटवृक्ष मंदिराची भव्यदिव्यता आणखीन उजळून येत आहे असेही मनोगत
मनोज लोहिया यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी सोलापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, साउथ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप काळे, गोपनीय खात्याचे धनराज शिंदे, गजानन शिंदे, शरद चव्हाण, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, संजय पवार, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.