अक्कलकोट, दि.24 : एसटी महामंडळाला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर बुस्टर डोस देण्याच्या योजने अंतर्गत राज्यातील 24 बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेत तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानकाचा समावेश करण्याची मागणी स्वामी भक्त व अक्कलकोट तालुक्यातून होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानके, आगार, अत्याधुनिक बांधकाम करतानाच उर्वरित जागांचा खासगी विकास कामामार्फत बीओटी तत्वावर विकास करण्याची योजना परिवहन विभागाने आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला गती देण्याचे निर्देश दिले असून पहिल्या टप्प्यात 5 हजार 245 कोटी रुपयांची कमाई एसटीला होईल असा अंदाज आहे.योजनेत पहिल्या टप्प्यात मुंबई विभागातील बोरीवली, राजेंद्रनगर, मुंबई सेंट्रल, बोरीवली ज्ञानसी कॉलनी, कुर्ला, विद्या विहार, ठाणे, भिवंडी, पुणे विभागात : शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड, लोणावळा, कोल्हापूर, सांगली तर नाशिक विभाग : नाशिक महामार्ग, जळगाव सीबीएस, जळगाव शहर, धुळे, नागपूर आणि अमरावती विभाग : मोरभवन नागपूर, हिंगणा, अमरावती, अकोला या 24 बसस्थानक व आगारांचा समावेश पहिल्या टप्प्यातील प्रस्तावितांमध्ये करण्यात आलेला आहे.
श्रीक्षेत्र अक्कलकोटचे बसस्थानक पाच दशकाहून अधिक काळ होवून गेले. सध्याची अवस्था पाहता बसस्थानकातील फलाटे ही पिल्लवर उभारल्याचे चित्र आहे. रस्ते उखडलेले, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, बसमधून बसस्थानकातून बाहेर पडताना जहाजात बसल्याची अवस्था प्रवाशांची होत आहे. परिसरातील धुळीमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेवून यावे-जावे करावे लागत आहे. दररोजची वाढती गर्दी पाहता त्याप्रमाणे व्यवस्था नसल्याने स्वामी भक्तांतून तीखट प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. संबंधित आगार प्रमुखांना विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांनी वेळोवेळी तक्रार करुन देखील त्यांच्याकडून माझ्या हातात काहीच नसल्याने आहे त्या परिस्थितीत आगार चालवतोय अशी प्रतिक्रिया दिली जात आहे.
बसस्थानकातील वीजेचा प्रश्न, व्यापारी गाळे, चालक-वाहकांचे विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, उपहार गृह, अतिक्रमणाचा विळखा या कोणत्याच सुविधा नसल्याने स्वामी भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्याकामी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीओटी तत्वावर विकास करण्याची योजना आखली असून या योजनेला गती देण्याकामी प्रक्रिया सुरु झालेली आहे. मात्र यामध्ये तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानक व आगाराला वगळण्यात आलेलेे आहे. नाशिक या एकाच विभागातील जळगाव सीबीएस, जळगाव शहर या दोन बसस्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबई, पुणे सारख्या महानगराचे ठीक आहे. मात्र राज्यातील टॉप फाईव्हमधील तीर्थक्षेत्रातील अक्कलकोट बसस्थानक हे फाईव्हस्टार, बसपोर्ट होणे गरजेचे आहे.
12 हजार 500 रुपये कोटीच्या संचित तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बुस्टर डोस देण्याच्या या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातच अक्कलकोटचे बसस्थानकाचा विकास करण्याची मागणी पुढे येत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक बांधून देतानाच उर्वरित जागेचा वापर विकासक व निवासी व व्यवसायिक बांधण्यासाठी करण्यात येणारआहे. त्यातून महामंडळाला 5.40 लाख चौ.मी. क्षेत्रफळाचे आणि 1 हजार 445 कोटी रुपयाचे तयार बांधकाम मिळेल. तसेच 3800 कोटी रुपयाची प्रिमियम स्वरुपात मिळतील. 10 वर्षापूर्वी राज्य सरकारने बीओटी तत्वावर विकास करण्याची योजना आणली होती पण तिला विकास सकाकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे त्यावेळच्या धोरणात बदल करुन यावेळी ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापक, सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. जागतिक निविदा मागविल्या जातील. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
व्यवसायिक दृष्ट्या मोठे मूल्य असलेले अक्कलकोट बसस्थानकाचा परिसराचा विकास होणे गरजेचे आहे, अशी मागणी स्वामीभक्त व अक्कलकोट तालुक्यातून होत आहे. या रास्त मागणी विचार होवून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर बुस्टर डोस देण्याच्या योजनेत समावेश करण्यात यावे.