अक्कलकोट, दि.२९ : चिमणीचे नाव पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे आम्ही कदापी सहन करणार नाही त्याला जशास तसे उत्तर देऊ, अशी भूमिका अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ग्रामस्थांनी घेतली आहे. सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आमचा तीव्र विरोध असून ग्रामपंचायतीमार्फत तसा ठराव घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे माजी संचालक आनंद तानवडे यांनी मंगळवारी दिली. याबाबत राजकारण बाजूला ठेवून तातडीची बैठक ग्रामस्थांच्यावतीने बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये पुढील निर्णयाबाबत ही चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बसवराज तानवडे हे होते.
आज विमान सेवा सुरू करा म्हणणारे लोक मुठभर आहेत पण सिद्धेश्वर कारखान्यावर हजारो लोकांचा संसार आणि त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. ते यातून उद्धवस्त होणार आहेत याची कल्पना त्यांना नाही. ज्यावेळी सोलापूरला विमानसेवा सुरू होती त्यावेळी हेच लोक तिकीट महाग आहे असे सांगत होते पण आज केवळ सिद्धेश्वर कारखान्याला विरोध म्हणून चिमणीचे नाव पुढे करून विकासाचा मुद्दा उपस्थित करत आहेत.
चिमणी पडण्याने सोलापूरचा विकास होणार आहे का ? असा सवाल तानवडे यांनी उपस्थित केला. दरवेळी गाळप हंगामा वेळीच चिमणी पाडकामाचा मुद्दा उपस्थित करून कारखान्याला विरोध करण्याचे काम काही लोक जाणून-बुजून करत आहेत त्यांना विकासापेक्षा व विमानापेक्षा कारखाना कसा बंद पडेल याची काळजी जास्त लागलेली आहे. हे सोलापूरची जनता कदापि होऊ देणार नाही. त्यांचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही, यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रशासनाला जाणीव करून देऊ, असा इशारा जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार यांनी दिला आहे.
बैठकीला चिदानंद कवडे, सायबणा जवळगे, संगप्पा चानकोटे, अप्पू देवकर, विजय बिराजदार, राजू पातळे, बसवराज जमगे, गुरुनिंगप्पा बिराजदार, दामोदर शिमगे, अप्पु निंबर्गी, दगड़ू देवकर, बाबू जवळगे, राजा दंगापुरे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाबाबत भूमिका स्वच्छ नाही
विकासाबाबत भूमिका स्वच्छ नाही हे कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्रच आहे. हे सर्वांना आता कळले आहे. जनता पण जागृत आहे. हे नक्की हाणून पडणार – बसवराज तानवडे,सरपंच