अक्कलकोट,दि.२९ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणाऱ्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावु,असा इशारा रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी दिला आहे. मंगळवारी, याबाबतचे निवेदन त्यांनी अक्कलकोटच्या तहसीलदारांना देण्यात आले. या शिष्टमंडळात रासप अक्कलकोट शहराध्यक्ष स्वामीराव घोडके, रिपाईचे जिल्हा सरचिटणीस सैदप्पा झळकी, रशिद खिस्तके, सैपन शेख,सुरेश सोनके, रवी सलगरे, सुरेश गायकवाड, शुभम मडिखांबे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना योग्य दर देऊन सहकार्य करण्याचे काम सिध्देश्वर साखर कारखाना करीत आहे. पण काही लोकांच्या हट्टापायी सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून साखर कारखाना बंद पाडण्याचा कोणी विचार करीत असेल तर त्यांचे मनसुबे कधीच पुर्ण होणार नाही. सोलापूरात काही वर्षापूर्वी विमानसेवा चालू होती त्यावेळी येथील उद्योजक विमान तिकीट भरपूर आहे म्हणून त्याला विरोध केला. सर्व सामान्य जनतेला ही सेवा परवडत नाही म्हणून ओरडणारे व्यापारी आज विमानसेवा चालू करण्यासाठी चिमणी पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे बरोबर नाही, असे मडीखांबे यांनी सांगितले.
बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळ सेवा चालू करण्यास येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. जेणेकरून येथील जनतेला त्याची सोय होईल. सिध्देश्वर साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जुना कारखाना आहे. आतापर्यंत या कारखान्याने सर्व शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे काम केले आहे, असे माडकर यावेळी म्हणाले.
हा कारखाना शेतकऱ्यांचा आत्मा आहे तरी हा कारखाना बंद पडल्यास हजारो शेतकऱ्यांचे कुटुंब आणी कामगारांची रोजी रोटीवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे सिध्देश्वर कारखान्याची चिमणी वाचवून विमानसेवा चालू रहावी, असे रशीद खिस्तके यांनी सांगितले.कारखान्याची चिमणी पाडल्यास रिपाई व रासपच्यावतीने जन आंदोलन उभा करण्याचा इशारा दोन्ही पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.