ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिमणी पाडले तर उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? मल्लिकार्जुन पाटील यांचा सवाल ; जेऊर येथे चिमणीच्या समर्थनार्थ ग्रामस्थांची बैठक

अक्कलकोट, दि.२ : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडणे तर अशक्य आहेच पण विनाकारण काही लोक यावरून वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चिमणी पाडली तरी उद्याच विमानसेवा सुरू होणार आहे काय ? याचे उत्तर कोणाकडेच नाही त्यामुळे हा वाद तात्काळ थांबवावा. कारखान्याचे सभासद आणि आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिला आहे. जेऊर (ता.अक्कलकोट) येथे सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्र येत काशिलिंग जेऊर येथील मंदिरात विचार विनिमय बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊस उत्पादक, सभासद शेतकऱ्यांनी पाटील यांना चिमणीच्या समर्थनार्थ निवेदन दिले.

चिमणी पाडण्याचा मुद्दाच चुकीचा आहे. गाळप थोडा काळ जरी थांबवला तरी गाळपावर अवलंबून असणारे अन्य उद्योग आर्थिक संकटात येतील.तोडणी आणि वाहतूक करणाऱ्यांची उचल सुद्धा फिटणार नाही. वाहतुकीसाठीचे कर्ज घेतलेल्या वाहनांचे हप्ते फिटणार नाहीत अशा कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थाही आर्थिक अडचणीत येतील. अर्थात साखर कारखान्यावर अवलंबून असणारे अर्थकारण हे आर्थिक कोंडीत सापडेल. या सगळ्या प्रकारात जर बारकाईने लक्ष घातले तर चिमणी पाडल्यानंतर कधीपासून विमानसेवा सुरू होईल.

विमानसेवा पुरवण्यासाठी कोणत्या कंपन्या तयार आहेत, विमानसेवा कशी असेल होटगी रोड विमानतळ अन्य कोणत्या शहरासोबत जोडले जाणार का ? याबाबत कोणीही माहिती देऊ शकत नाही म्हणून हा असला बिनबुडाचा विषय विरोधकांनी थांबवावा आणि कारखान्याला वेठीस धरण्याचे काम बंद करावे, असे पाटील यावेळी म्हणाले.

कारखाना बंद केला तर कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे करायचे, हा ऊस कोणत्या कारखान्याकडे वळवायचा यासारखे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. मग याला जबाबदार कोण. दरवर्षी गाळप हंगामावेळी काहीतरी वाद निर्माण करून सिद्धेश्वर कारखान्याला त्रास देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे.हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. प्रसंगी कुठल्याही थराला जाऊन आंदोलन करू. पण चिमणी पाडू देणार नाही, असे काशिनाथ कडगंची यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. अनेकांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीच्या समर्थनार्थ मनोगत व्यक्त केली.

यावेळी जेष्ठ नेते शिवाजीराव कलमदाने,नागनाथ सुरवसे, काशिनाथ कडगंची, अप्पाशा पुजारी, अंबणा कनोजी, किसन राठोड, सिद्धाराम बामणे, नुरू राठोड,पुत्रप्पा बिज्जरगी, मल्लिनाथ अजगोंडा,सुभाष पाटील,विश्वनाथ देसाई, श्रीमंत झंपा, नागनाथ कापसे, बसवराज कळवंत, कलप्पा कळवंत, राम हुक्केरी, शिवानंद हडपद, बसवराज कापसे, शिवानंद उमराणी, धानप्पा गददे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी सभासद बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!